रहिमतपूर : रहिमतपूर-सातारा रस्त्याच्या डांबरीकरण सुरू केलेल्या कामाला वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. रस्त्याचे अद्याप चाळीस टक्के काम शिल्लक आहे. तसेच पुलांची उभारणी करणेही बाकी आहे. काही ठिकाणी जुन्या डांबरी रस्त्यांवरील डांबर खरडून त्यावरच मलमपट्टी सुरू आहे. या रस्त्यावरील पावसाळ्यापर्यंत डांबरीकरण पूर्ण होण्याची शक्यता धुसर होऊ लागली आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रहिमतपूर-सातारा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होऊन वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. रहिमतपूर ते धामणेर बसस्थानकांपर्यंत डांबरीकरणाचे काम रेल्वेस्टेशनजवळील काही अंतर वगळता पूर्ण झाले आहे. परंतु धामणेर बसस्थानक ते सातारा या दरम्यानच्या रस्त्यामधील सर्वच ओढ्यांवरील पुलांची कामे करणे बाकी राहिले आहे. केवळ जुने पूल काढून त्याठिकाणी खोदकाम करून जैसे थे परिस्थिती आहे. अपवादात्मक एका पुलाची उभारणी सुरू आहे; तर चाळीस टक्के रस्त्याचे डांबरीकरण करणे शिल्लक आहे. सध्या डांबरीकरणाचे काम सुरू असले, तरी अगदी कासवगतीने सुरू आहे. काही ठिकाणी तर गडबड सुरू असून, जुने डांबर वितभरच उकरून त्यावरच मशीनमधून लहान माल टाकून त्यावरच डांबरीकरण करण्याचा उद्योग सुरू आहे. रस्त्याच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी यंत्रणा सुस्तावली आहे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. धिम्या गतीच्या डांबरीकरण कामामुळे यंदाचा पावसाळाही खड्ड्यातूनच ये-जा करून काढावा लागणार, असे चित्र दिसू लागले आहे.
(चौकट)
पावसाळ्यापूर्वी काम उरकण्याची गरज
रहिमतपूर-सातारा रस्त्यावरील वाहनधारकांनी गत पावसाळा खड्ड्यांतूनच कसरत करून काढला. यंदा पुन्हा तीच वेळ वाहनधारकांवर येऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात लक्ष घालावे. ओढ्यावरील पुलांची कामे दोन महिन्यांत पूर्णत्वाला जाणे अत्यंत गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष वेधावे, अशी अपेक्षा वाहनधारकांतून व्यक्त केली जात आहे.
२५रहिमतपूर
फोटो : रहिमतपूर-सातारा रस्त्यावर एका ठिकाणी जुने डांबर खरडून काढून त्यावरच डांबरीकरणापूर्वीचा माल ओतला जात आहे.
( छाया : जयदीप जाधव)