कराडः गुन्ह्यात मधात करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोपपत्र लवकर सादर करावे यासाठी चार हजार रूपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी ही कारवाई केली.
महादेव तात्याबा जगताप ( वय ५६ रा. पोलीस वसाहत कराड ) असे ताब्यात घेतलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार तक्रारदार बावीस वर्षीय युवकावर कराड पोलीसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच न्यालयात दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी सहाय्यक फौजदार जगताप याने युवकाकडे चार हजाराची लाच मागितली.
युवकाने याबाबत सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत चे अधिक्षक सुहास नाडगौडा यांनी तक्रारीची दखल घेत निरीक्षक अरिफ मुल्ला यांच्या पथकाला तक्रारीची खातरजमा करण्याच्या सुचना दिल्या.
लाचलुचपतच्या पथकाने तक्रारीची पडताळनी केली असता सहाय्यक फौजदार जगतापने तक्रारदार युवकाकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी दुपारी याबाबत कराड तालुका पोलीसठाण्यात गुन्हा नोंद करून जगतापला ताब्यात घेण्यात आले.