सातारा : अवैध दारु वाहतूकच्या गुन्ह्यात मदत आणि पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी एक लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणात आैंध ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आणि सहायक फाैजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात पकडले. यामध्ये लाच स्वीकारताना फाैजदार रंगेहाथ सापडला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी आैंधमध्येच झाली. तर या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, या घटनेतील तक्रारदाराच्या परमीट रुममधून दारुची अवैध वाहतूक केल्याने आैंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करणे आणि येथून पुढे त्रास न देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती एक लाख देण्याचे ठरले. यानंतर तक्रादाराने सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करुन शुक्रवारी आैंध, ता. खटाव येथे सापळा लावला. दुपारी चारच्या सुमारास जुना एसटी बसस्थानक बाजार पटांगणात सहायक फाैजदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधिताचे नाव बापूसाहेब नारायण जाधव (वय ५४) असे आहे. तर सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव दत्तात्रय परशुराम दराडे असे आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आैंध पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ही कारवाई सातारा लाचलुचपतच्या पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य, हवालदार नीलेश चव्हाण, तुषार भोसले, नीलेश येवले आदींनी केली. दरम्यान, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी काम करण्यास शुल्का व्यतीरिक्त लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.