नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) गावातील भरवस्तीत बिबट्याचा खात्रीशीर वावर असल्याचे चित्र मंगळवारी रात्री स्पष्ट झाले आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे येथील बाजूच्या नागठाणे-सासपडे रस्त्यावरील भरवस्तीत बिबट्याचा वावर असल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे प्राथमिक आरोग्य केंद्र ते महामार्ग सेवारस्ता या भागात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
या घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देऊनही याची त्यांच्याकडून कोणतीच हालचाल न झाल्याने, ग्रामस्थांमध्ये बिबट्याच्या वावराने भीतीचे सोबत वनविभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास येथील महामार्गालगतच असलेल्या राजेंद्र दिनकर जगताप यांच्या घराच्या पत्र्यावर उडी मारून कोणीतरी पळत गेल्याचा आवाज झाला. यावेळी रस्त्यावरील भटकी कुत्रीही जोरजोरात भुंकू लागल्याने, जगताप कुटुंबीयांना शंका आल्याने त्यांनी घराभोवती लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज तपासली, त्यावेळी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडील पटांगणातून बिबट्या त्यांच्या विटेच्या भिंतीचे कंपाउंड पार करून घराच्या पत्र्यावर गेल्याचे निदर्शनास आले. पत्र्यावरून तसाच पळत हा बिबट्या शेजारील आप्पा निकाळजे यांच्या पत्र्यावर गेला. त्यानंतर, काही काळाने पुन्हा या बिबट्याचे दर्शन राजेंद्र जगताप यांच्या हॉटेलच्या पुढील बाजूस महामार्गावरील बाजूचे रस्त्यावरही झाले. तेथून हा बिबट्या कुत्र्यांचा ससेमिरा चुकवत याच भागात कोठेतरी नाहीसा झाला. साधारणतः तीन तास या बिबट्याचा या परिसरात वावर सुरू असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले. जगताप कुटुंबीयांनी याची माहिती तत्काळ बोरगाव पोलीस व वनविभागाला दिली. बोरगाव पोलिसांच्या रात्रगस्तीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ येथे येऊन पाहणी ही केली. मात्र, या घटनेची माहिती दिवसात अनेकदा वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना देऊनही त्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत येथे येऊन साधी पाहणी करण्याचीही तसदी घेतली नाही. भरवस्तीत बिबट्या रात्रभर फिरत असल्याने, नागठाणे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे व वनविभागाच्या सुस्त व बेफिकीर धोरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.