खंडाळा : तालुक्यातील औद्योगिकीकरण टप्पा क्र. तीन मधील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढण्यासाठी १५८९ हेक्टर क्षेत्रासाठी ७५२ हरकती दाखल झाल्या आहेत. शिक्के काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी यासाठी शेतकऱ्यांनी उपोेषणाचा मार्ग पत्करला होता. उपोेषण सोडताना पंधरा दिवसांत मीटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, महिन्यानंतरही साधी मीटिंगची तारीखही ठरविण्यात आली नाही. त्यामुळे शिक्के काढण्याचा प्रश्न प्रलंबितच असून, शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरणाचा तिसरा टप्पा खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, मोर्वे, शिवाजीनगर, भादे या सात गावांतील जमिनीवर साकारला जात आहे. यामध्ये जवळपास १६८० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहण करता येणार नसल्याचा शासनाचा कायदा आहे. मात्र, या जमिनीवर एमआडीसीचे शिक्के असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अधिग्रहणाला विरोध असताना शिक्के का काढले जात नाहीत? ते तातडीने काढण्यात यावेत, यासाठी अस्थानिक शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. चार दिवसांच्या उपोषणानंतर पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम जाधव यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांनी उपोषण सोडले. शिक्के काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासठी १५ दिवसांत उद्योगमंत्री व संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. १२ आॅगस्ट रोजी उपोषणाची सांगता केली गेली. त्यानंतर २५ आॅगस्टपर्यंत बैठकीचे नियोजन करण्याचे ठरले होते. मात्र, राज्यकर्त्यांसह मध्यस्थांनाही त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर येत आहे.शेतकऱ्यांना हरकती दाखल करता याव्यात, यासाठी काही दिवस खंडाळा तहसील कार्यालय व त्यानंतर फलटण प्रांत कार्यालयात सोय केली होती. यामध्ये शिवाजीनगर- ४०६ हेक्टर, मोर्वे- ४१२ हेक्टर, भादे- २७८ हेक्टर, अहिरे- २६७ हेक्टर, म्हावशी- १४३ हेक्टर, खंडाळा- १६ हेक्टर, बावडा- ६२ हेक्टर, अशा एकूण १५८९ हेक्टर क्षेत्राबाबत हरकती दाखल झाल्या आहेत. पूर्वी दिलेल्या हरकती गहाळ झाल्याने शेतकऱ्यांनी नव्याने हरकती दिल्या आहेत. शासनस्तरावर तातडीने यावर कार्यवाही होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी धावपळ केली खरी. मात्र, अद्यापतरी राज्य शासन स्तरावर कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)आमच्या जमिनीवर नाहक शिक्के मारले गेले आहेत. ते काढून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला, यासाठी आम्ही शेतकरी कृती समितीच्या वतीने उपोषण केले. सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले. मात्र, पंधरा दिवसांची मुदत देऊनही काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आमच्यापुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.- तेजस भोसले, शेतकरी, शिवाजीनगर
आश्वासन दिले; पण वेळ नाही म्हणे!
By admin | Published: September 09, 2016 11:27 PM