शिरवळ - मुराद पटेल खंडाळा तालुक्यातील भादे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वाहनाचे भाडे व नुकसानभरपाई मागितल्याप्रकरणी दुचाकीवर येत आडवी मारून शिवीगाळ करीत बंदुकीचा धाक दाखवून कोयत्याने डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी लोणंद भागातील खून प्रकरणातील व तडीपार गुंडासहित तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची घटनास्थळावरून व शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,भादे येथील मोक्का गुन्ह्यात जामिनावर असलेला नितीन उर्फ आप्पा अशोक साळुंखे(वय 33,रा.भादे ता.खंडाळा) याने पिकअप जीप (क्रं-एमएच-11-डीडी-1187) ही कापडगाव ता.फलटण येथील हरिष(हरी)मलगुंडे याला भाडेतत्त्वावर दिले होती.
यावेळी नितीन साळुंखे हा मंगळवार दि.11 जून रोजी पिकअप जीप घेण्यासाठी व भाडे घेण्यासाठी लोणंद येथे गेला असता त्याठिकाणी जीपचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले .यावेळी नितीन साळुंखे याने भाडे व नुकसान भरपाई मागितली असता हरिष मलगुंडे याने शिवीगाळ केली.दरम्यान,नितीन साळुंखे व आर्यन संतोष जाधव हे गुरुवार दि.13 जून रोजी वाठार कॉलनी येथून दुचाकी (क्रं-एमएच-11-डीई-4740)वरून भादेकडे येत असताना पाठीमागून दुचाकीवर सराईत गुन्हेगार हरिष(हरी)मलगुंडे(कापडगाव ता.फलटण),खून प्रकरणात जामिनावर असलेला मेहुल पाटील(रा.लोणंद ता.खंडाळा) व सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला शेखर खताळ(रा.कापडगाव ता.फलटण) हे येत नितीन साळुंखे याच्या दुचाकीला आडवी मारत हरिष याने शिवीगाळ करून कमरेची बंदूक काढून नितीन साळुंखे याच्या दिशेने धरत दमदाटी केली तर मेहुल पाटील याने याने हातातील कोयता उलटा डोक्यात घालून गंभीर जखमी केले.
यावेळी नितीन साळुंखे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून हरिष मलगुंडे,मेहुल पाटील, शेखर खताळ यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार हे अधिक तपास करीत आहे.