कराड : शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स लि, रयत युनिटकडे चालू गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रिक टन २९२५/- रुपये प्रमाणे एकरकमी ऊस बिल देणार असल्याची माहीती अथणी शुगर्स चे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली.अथणी शुगर्स लिमिटेड रयत युनिट, शेवाळेवाडी या युनिट चा २०२२-२३ हंगामाच्या मोळी पुजनाचा समारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील व अथणी शुगर्सचे कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला, त्यावेळी लवकरच यावर्षीच्या ऊस दराबाबत घोषणा केली जाईल अशी माहिती दिली होती त्याप्रमाणे ऊस दराची एकरक्कमी घोषणा करत यंदाही सातारा जिल्ह्यात सर्व प्रथम अथणी रयतनेच आघाडी घेतली.अथणी शुगर्सच्या रयत युनिटने गत हंगामात ५,३६,५७९ मेट्रिक टन गाळप केले आहे. सरासरी १२.३० साखर उतारा राखत ६,६४,७२० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले असून गाळप केलेल्या ऊसाचे प्रति मे.टन रू. २९२५/- प्रमाणे एक रक्कमी ऊस बिल संबंधित शेतकन्यांच्या बँक खात्यावर वेळेवर वर्ग केले होते. सदर हंगामात कारखान्याने एफआरपी पेक्षा प्रति मेट्रिक टन १४० रूपये जादा दर दिला आहे.शेतकन्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास व शेतकन्यांचे हित विचारात घेवून चालू गळीत हंगामात देखील गाळपास येणाऱ्या ऊसाचे एकरकमी प्रति मेट्रिक टन २९२५/- प्रमाणे ऊस बिल देण्याचा निर्णय अथणी शुगर्स व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच प्रतिवर्षा प्रमाणेच चालू गळीत हंगामात देखील ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टनास एक किलो साखर सवलतीच्या दराने वाटप केले जाणार असून त्यामधूनही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तरी सन २०२२-२३ करीता निश्चित केलेले ५,५०,००० मेट्रिक टन गळीताचे उदिष्ट पुर्ण करणेसाठी ऊस उत्पादकांनी आपला जास्तीत जास्त ऊस अथणी शुगर्स लि. (रयत युनिट) या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.
सातारा: अथणी-रयत कारखान्याची यंदाही ऊस दरात आघाडी, एकरकमी जाहीर केला 'इतका' दर
By प्रमोद सुकरे | Published: October 25, 2022 2:37 PM