सांगली : ‘एटीएम’च्या यंत्रात पैसे न भरता, ते परस्पर हडप करुन दोन बँकांना सव्वा कोटीचा गंडा घालणाऱ्या तिघा संशयितांना शुक्रवारी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. २०११ मध्ये एटीएमचा हा घोटाळा उघडकीस आला होता.
सलीम हमीद शेख (वय ३०, रा. अष्टविनायकनगर, विश्रामबाग), निहाल अहमद दस्तगीर मुल्ला (३१) व ख्वाजा अमीर कलंदर तांबट (२९, दोघे रा. कुपवाड) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. सलीम शेख याला पाच वर्षे, तर अहमद मुल्ला व अमीर तांबट यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आर. पाटील यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. सरकारतर्फे अॅड. एम. आर. किल्लेदार, अॅड. एस. एम. पखाली व पी. पी. हजारे यांनी काम पाहिले.
बँक आॅफ महाराष्ट व अॅक्सीस बँकेने त्यांच्या सांगली, तासगाव, आष्टा व जयसिंगपूर येथील अकरा शाखांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचा ठेका दिल्लीतील सिक्युटिरी इंडिया कंपनीकडे दिला होता. यासाठी कंपनीने सलीम शेख याची नियुक्ती केली होती. या कामासाठी सलीमने निहाल व ख्वाजा तांबट या दोघांना मदतीसाठी घेतले होते. हे तिघे मिळून सिक्युटिरी इंडिया कंपनीसाठी या बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम पाहात होते.
या अपहारप्रकरणाचा सूत्रधार असलेला सलीम शेख काम करत असताना बँकांच्या कामकाजाच्या पध्दतीवर लक्ष ठेवून होता. संधी मिळताच वेळोवेळी या तिघांनी १ जुलै २००८ ते २८ डिसेंबर २०११ या कालावधित तब्बल एक कोटी ३४ लाख ९२ हजार पाचशे रुपयांची रोकड एटीएममध्ये न भरता परस्पर हडप केली होती. एटीएम घोटाळ्याचे हे प्रकरण उघडकीस येताच बँक आॅफ महाराष्ट्र व अॅक्सीस बँक व्यवस्थापनास धक्काच बसला होता. याप्रकरणी कंपनीचे बाळासाहेब मिसाळ यांनी विश्रामबाग व शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता.तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर व सहायक निरीक्षक अश्विनी बिद्रे यांनी तपास केला होता. सलीम शेखसह तिघांना अटक केली होती. गेल्या काही महिन्यांपासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. सरकारतर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले.सलीम कारागृहातसलीम शेख हा सध्या कारागृहातच आहे. निहाल मुल्ला व ख्वाजा तांबट हे दोघे जामिनावर बाहेर आहेत. शिक्षेसोबत सलीमला पन्नास हजाराचा, तर निहाल आणि ख्वाजाला प्रत्येकी तीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने जादा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलीमला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त केलेले ७५ हजार रुपये सरकारकडे जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.