ढेबेवाडी : एकीकडे नदीवरील तुटलेला पूल, तर दुसरीकडे कोसळणारा डोंगर अशा मोठ्या संकटात सापडलेल्या जितकरवाडी-धनावडेवाडीसह अन्य गावांतील लोकांचा वीस दिवसांपासून जीवन-मरणाचा संघर्ष चालू आहे. सिमेंट पूल दोन वर्ष झाले वाहून गेल्याने येथील जनतेचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, सिमेंट काँक्रिटच्या तुटक्या पुलाला लोखंडाचे जोडगान देऊन नदीवर सेतू उभारण्याची किमया जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली आहे.
जितकरवाडी, धनावडेवाडी, भातडेवाडी, शिंदेवाडी या वाड्यावस्त्यालगतच्या डोंगरांनी जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आपली जागा सोडली. यामुळे येथील जनतेची झोपच उडाली. गावाच्या डोक्यावर कधी डोंगर कोसळेल याची शाश्वती राहिली नव्हती. अशातच घाबरलेल्या गावकऱ्यांनी गावच सोडून जाण्याची तयारी केली. दुसऱ्या बाजूला वांग नदीला आलेल्या पुरामध्ये गावाला जोडणारा पूलच वाहून गेला. यामुळे येथील लोकांना जीव मुठीत धरून दोन दिवस काढावे लागले.
त्यानंतर आजूबाजूच्या गावातील गावकरी काही सामाजिक कार्यकर्ते यांनी येथील लोकांना गावाबाहेर काढले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याची दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाला येथील दळणवळण सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करत बांधकाम विभागाने तुटलेल्या सिमेंट काँक्रिटच्या पुलालाच जोडगान देत दहा फूट खोली असलेल्या नदीपात्रात सेतू उभारण्याचे काम करून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला हा पूल सलग दोन वर्षांपासून वाहून जाण्याची घटना घडल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे. या कामापूर्वी संबंधित अधिकारी यांनी पाण्याचा प्रवाह आणि कामाची पद्धत याचा समन्वय साधला नसल्याची चर्चा आहे. या तुटक्या पुलावर लोखंडाचं जोडगान देऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे.
पंधरा फूट पाण्यात केली कसरत..
ठेकेदार विक्रम यादव यांनी आठ दिवसांत जितेंद्र लोहार, कुंदन माने, आदित्य माने या कारागिरांच्या मदतीने नदीपात्रात दहा फूट खोल पाण्यातून मार्ग काढत हे काम पूर्ण केले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील गंभीर घटनेची तातडीने माहिती घेतली. कसल्याही परिस्थितीत हा पूल पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता भंडारे, शाखा अभियंता कांबळे यांनी हे काम पूर्ण करून जनतेला दिलासा दिला आहे.
- मनोज मोहिते
सामाजिक कार्यकर्ते.
फोटो १२रवी माने
वांग नदीवर जीतकरवाडीनजीक लोखंडी पूल उभारला आहे. (छाया : रवींद्र माने)