कऱ्हाड : आम्ही या एरीयाचे भाई आहे, असे म्हणत भाजी विक्रेत्यांना चाकू व कोयत्याचा धाक दाखवून भरदिवसा खंडणी मागण्यात आली. तसेच हप्ता द्यायला नकार दिल्याने युवकावर वार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहीत रमेश कारंडे (रा. चांभारगल्ली, गुरूवार पेठ, कऱ्हाड), श्रीधर थोरवडे, बाळू कुर्ले (रा. कऱ्हाड) यांच्यासह अन्य एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. याबाबत श्रीकांत सुर्यकांत शिंदे यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूवार पेठेत राहणारे श्रीकांत शिंदे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते गुरूवार पेठेत भाजी विक्री करीत असताना रोहीत कारंडे याच्यासह त्याचे अन्य साथीदार त्याठिकाणी आले. आम्ही या एरीयाचे भाई आहोत. आम्हाला हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दमदाटी केली. श्रीकांत यांनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी कोयता व चाकूने त्यांच्यावर वार केला. मात्र, श्रीकांत यांनी तो वार चुकवला. त्यावेळी इतर भाजी विक्रेते भीतीने भाजीपाला जागेवरच सोडून पळून गेले.चाकू व कोयत्याचा धाक दाखवत आरोपींनी श्रीकांत शिंदे यांच्या खिशातील साडेआठशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच इतर विक्रेत्यांनाही हप्ता देण्यासाठी धमकावले. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.
Satara: खंडणीसाठी भाईगिरी, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने वार; कऱ्हाडातील घटना
By संजय पाटील | Published: January 05, 2024 7:05 PM