सातारा : वाढती बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती आदी विषयांच्या अनुषंगाने दहा केंद्र्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सातारा येथे सर्व क्षेत्रातील कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून संपाची तयारी केली होती. राज्य कर्मचारी, बँक, पोस्ट, बीएसएनएल, जिल्हा परिषद व इतर कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
या आंदोलनात अंगणवाडी, बांधकाम कामगार व अन्य संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला. बेरोजगारी, नोकरभरती, कंत्राटी कर्मचारी कायम करणे, खासगीकरण, सार्वजनिक उद्योगांची विक्री आणि खासगीकरणास विरोध, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना निश्चित पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण व आरोग्य क्षेत्राच्या खासगीकरणास विरोध, योजना कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतन आणि मान्यता मिळावी, मालकधार्जिन्या कामगार कायद्यातील बदलांना विरोध, संरक्षण व इतर क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवण्यास विरोध आदी बाबत हा संप पुकारण्यात आला.दरम्यान, महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपूर्ण दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महसूल विभागातील काम पूर्णत: ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ग्रामीण भागात बंद ठेवण्यात आला होता.
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी करारावर केंद्र सरकारने स्वाक्षरी करु नये, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीपंपाचे वीज बिलमाफी व इतर प्रमुख मागण्यांसाठी सातारा-कोरेगाव हा रस्ता बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रोखण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.बुधवार ठरला आंदोलन डेशासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी बुधवारी मोर्चे, रास्ता रोको, धरणे, निदर्शने अशी आंदोलने केली. विविध संघटनांच्या या आंदोलनांमुळे बुधवार हा आंदोलन डे ठरला.