तासगाव : बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा ट्रक अडवल्यानंतर ट्रकसोबतच्या जीपमधील दहा-अकराजणांनी तासगावचे निवासी नायब तहसीलदार, नायब तहसीलदार आणि तलाठी यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. तासगाव तालुक्यातील योगेवाडी ते कुमठेदरम्यान झालेल्या प्रकाराची तासगाव पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या आदेशानुसार तासगाव तालुक्यात वाळूची तस्करी रोखण्यासाठी काही दिवसांपासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले, नायब तहसीलदार शेखर दळवी आणि तलाठी प्रमोद कोळी यांचे पथक गस्त घालत होते. सकाळी दहाच्या सुमारास कर्नाटकातील बेगमपूरहून सांगलीकडे वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच १० झेड २७१८) या पथकाच्या निदर्शनास आला. योगेवाडी ते कुमठे या रस्त्यावर ट्रक अडविण्यात आला. ट्रकमध्ये सुमारे दहा ब्रास वाळू होती. ट्रकचालकाकडून वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे २२ जूनची जुनी पावती होती. त्यामुळे नायब तहसीलदार ढाले यांनी हा ट्रक ताब्यात घेण्याचे आदेश दिले. ट्रक अडविल्यानंतर ट्रकसोबत असलेल्या टाटा सुमो (एमएच २१ बी ८३५) या गाडीतून दहा-अकराजण खाली उतरले. त्यांनी नायब तहसीलदारांशी वादावादी करत ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा पाठलाग करून कुमठे फाट्याच्या पुढील बाजूस पेट्रोल पंपाजवळ ट्रक अडविण्यात आला. तेथे या गाडीतील मालक अंकुश रामचंद्र देवर्डे (रा. तुंग, ता. मिरज), उदय श्रीकांत कोळी, पवन मधुकर पाटील, प्रतीक दिलीपराव शिंदे, अनिकेत आप्पासाहेब गुरव यांच्यासह दहा-अकराजणांनी शिवीगाळ करून ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेथून पळून गेल्यानंतर पुन्हा या ट्रकचा पाठलाग करून कवलापूरजवळ तो अडविला. तेथे निवासी नायब तहसीलदार ढाले यांच्यासह पथकातील इतरांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून ट्रक अंगावर घालण्याचा इशारा देत ट्रकसह सर्वजण पळून गेले. त्यानंतर ढाले यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी ट्रक आणि सुमो गाडी ताब्यात घेतली. या घटनेनंतर सुनील ढाले यांनी तासगाव पोलिसांत तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्यास चालढकल दोन नायब तहसीलदार आणि तलाठी यांच्या अंगावर वाळूचा ट्रक घालण्याचा प्रकार सकाळी घडला. पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सांगलीतील पोलिसांनी ट्रक आणि सुमो गाडी ताब्यात घेतली. मात्र, गुन्हा तासगावात नोंद करण्यास सांगितले. त्यामुळे निवासी नायब तहसीलदार ढाले यांनी तासगाव पोलिसांत तक्रार अर्ज दिला. मात्र, रितसर फिर्याद आली नसल्याचे कारण सांगून उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. गंभीर घटना घडूनही पोलिसांकडून चालढकल होत असल्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
ाायब तहसीलदारांवर हल्ला
By admin | Published: June 25, 2015 1:02 AM