सातारा : येथील उद्योजक चाँद शमशुद्दीन शेख (वय ३६) यांना मारहाण करून लुटल्याचा आरोप असलेले चार संशयित वडूज (ता. खटाव) येथे पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून मोबाइल आणि दीड हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. बाजीराव विलास कोरडकर, आकाश ज्ञानेश्वर कापले, अमर बापूसाहेब देवगुडे (सर्व, रा. कोडोली ता. सातारा) अशी संशयितांची नावे असून, एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. मूळचे वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील असलेले चाँद शेख यांचा नवीन औद्योगिक वसाहतीत ‘सी-टेक इंजिनिअरिंग’ नावाचा कारखाना आहे. बुधवारी रात्री पावणेदहा ते दहाच्या सुमारास ते दुचाकीवरून कारखान्यातून परत निघाले होते. चंदननगरजवळील ओढ्याजवळ एक ढाबा आहे. या ढाब्यासमोर काही जणांची भांडणे सुरू होती. ते पाहून शेख यांनी दुचाकीचा वेग कमी केला. भांडणे करणाऱ्या तिघांनी अचानक शेख यांच्यावरच हल्ला केला. दांडक्याने त्यांच्या डोक्यावर व तोंडावर आघात केले. मारहाण करणाऱ्यांनी शेख यांच्या खिशातील सुमारे बारा हजार रुपयांचा मोबाइल फोन, एक तोळ्याचे लॉकेट, अर्धा तोळ्याची अंगठी व साडेआठ हजारांची रोकड असलेले पाकीट हिसकावून नेले होते. पाकिटात शेख यांचे एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्डही होते. ही घटना बुधवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. रविवारी दुपारी संशयित वडूज (ता. खटाव) येथे सापडले. त्यांना साताऱ्यात आणले असून, पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)
हल्लेखोर वडूजमध्ये सापडले
By admin | Published: February 01, 2016 1:09 AM