मलकापूर : महामार्गावर असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. त्यानंतर पोलिसांना सापळा रचून काही तासांतच दोन चोरट्यांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीसाठी वापरलेले गँसकटरसह दुचाकी जप्त केली आहे.
येथील उपमार्गालगत बँक ऑफ इंडिया शाखेच्या शेजारी रश्मी ट्रान्सपोर्ट इमारतीत रविवारी मध्यरात्रीनंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील विठ्ठलदेव सोसायटीत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शाखेच्या शेजारी उपमार्गालगत असलेल्या रश्मी ट्रान्स्पोर्टच्या इमारतीत आयसीआय बँकेचे एटीएम मशीन आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अहोरात्र ही सुविधा सुरू ठेवली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मशीनमधील रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने शटर बंद करून गँसकटरने मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. ही बाब रश्मी ट्रान्स्पोर्ट येथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आली. त्याने तातडीने महामार्ग पोलीस चौकीत जाऊन खबर दिली. खबर मिळताच महामार्ग पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ कळके यांनी वरिष्ठांसह कराड शहर पोलीस ठाण्यात व सातारा कंट्रोल कार्यालयात माहिती दिली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कळके यांच्यासह उपनिरीक्षक लांडगे, जाधव, हवालदार पाटील, रांजगे, गायकवाड व कराड शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय भरत पाटील, पोलीस नाईक, अमोल साळुंखे यांच्यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच दुचाकीसह साहित्य तेथेच टाकून चोरटे पसार झाले. दुचाकीसह साहित्य न हलवता पोलिसांनी सापळा लावला. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एकजण दुचाकीवर येऊन बसला. दबा धरून बसलेल्या अमोल साळुंखे यांनी झडप घालून त्याला धरले. विचारपूस केली असता प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पीएसआय भरत पाटील यांनी पोलिसी खाक्या दाखवताच एटीएम फोडत असल्याचे कबूल केले. दुचाकीसह गँसकटर, कटावणी साहित्य जप्त केले, तर अर्धवट फोडलेल्या मशीनसह घटनास्थळाचा पंचनामा केला. त्या चोरट्याच्या सांगण्यावरून इस्लामपूर येथील त्याच्या साथीदारालाही गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चौकट
मलकापुरातील एटीएम फोडण्याचा दुसरा प्रकार
मलकापुरात दोन वर्षांपूर्वी मध्यरात्री महामार्गालगत एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम सेंटरमधील मशीन उचकटून चार चोरांच्या टोळीने नोटांसह मशीनच गायब केले होते. चार चाकी वाहनातून आलेल्या चौघांनी एटीएम मशीन पळवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडल्यामुळे मलकापुरात एटीएमची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.