कऱ्हाड : जनशक्ती आघाडीने केलेल्या विशेष सभा रद्द करण्याच्या मागणीला सभागृहात सहमती द्यायची आणि त्यानंतर पत्रक काढून त्यावर टीका करायची, ही बाब सभागृहाची व कऱ्हाडकरांची फसवणूक करणारी आहे. खोटारडेपणाचा कळस गाठणाऱ्या नगराध्यक्षांना त्या पदाचे पावित्र्य जपण्याचेही भान राहिलेले नाही. त्यांनी उधळलेली मुक्ताफळे म्हणजे स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्याचा केविलवाणा प्रकार आहे, असा आरोप महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी विशेष सभेवरून केलेल्या आरोपाला स्मिता हुलवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, जनशक्तीची मागणी चुकीची होती, तर त्या मागणीचे तुम्ही सभेत समर्थन का केले? काही तरी थातुरमातुर उत्तर देऊन लोकांची, पालिकेची व नगरसेवकांची दिशाभूल करणे थांबवावे. बहुमताने कोविडच्या उपाययोजनांची बैठक घेण्यास आपल्याला भाग पाडले. त्याची तुमच्यावर नामुष्की आली. आपण घेतलेली सभा रद्द करावी लागली व आम्ही मागणी केली म्हणून सभा तुम्हाला घ्यावी लागली आहे. तुम्ही फक्त लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून मिरविण्यातच समाधानी राहा. आजवर आम्ही तुम्हाला समजून घेतले. शहराच्या हितासाठी बऱ्याच वेळा तुमच्या चुकांना पाठीशी घातले. तुम्ही जनतेतून नगराध्यक्षा झालात, त्याचा मान ठेवला. मात्र त्याचे भान न ठेवता आपण मन मानेल तसे वागत आहात; त्यामुळे आपल्याला आता इथून पुढे जशास तसे उत्तर मिळेल.
स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी नगराध्यक्षांनी विशेष सभा घेतली. सभेची कार्यवाही सात दिवसात पूर्ण करणे, तसे ठराव करणे हे नगराध्यक्षांचे अधिकार आहेत. त्यात प्रशासनाचा काही संबंध नाही. सभेचे प्रोसिडिंग अपूर्ण आहे त्यामुळे विशेष सभा घेतली, असे आपण स्वतःहून कबूल केले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव नाही, हे स्पष्ट होते.
तुम्हाला वाटते की, आम्ही ठरवून भांडण केले, तर पाच वर्षे सभागृहामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त होऊन तुमचा झालेला दंगा सगळ्या शहराने अनुभवला आहे. आपण काय आहात अन् काय नाही हे साऱ्यांनाच माहीत झाले आहे. तुम्ही काम करत असल्याचे सांगत आहात,पण तुम्ही तर मिरवण्यासाठीच काम करतात. कोणाचा मृत्यू झाला असला आणि त्या ठिकाणी भेट दिली, तर त्याचे फोटो काढता, हे मिरवणे नाही तर काय आहे? कोरोनासाठी आपण फिरला असे म्हणता. पण ते फिरणे नव्हते, तर ते निव्वळ मिरवण्यासाठी फिरत होता, हे आम्ही वेळोवेळी सिद्ध केले आहे, असेही हुलवान यांनी म्हटले आहे.