शिरवळ : खंडाळा तालुक्यातील भोळी याठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा राग मनात धरून भरधाव वेगाने पिकअप गाडी गावामधून चालवित दोन कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतला. त्यानंतर दुचाकीवरून घरासमोर येत जिवे मारण्याची धमकी देऊन छर्र्याच्या बंदुकीने दोन वेळा फायरिंग करीत दहशत माजविली. याप्रकरणी तोंडल येथील सूरज भोसलेसह सहाजणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची शिरवळ पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भोळी याठिकाणी साधारणपणे दीड महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली आहे. काही दिवसांपूर्वी सरपंचपदाची निवडणूक झाली आहे. दरम्यान, शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी भोळी येथील विशाल चव्हाण व तोंडल येथील सूरज भोसले यांनी निरंजन चव्हाण याला मंदिराजवळ बोलावत निवडणुकीच्या कारणावरून मारहाण केली होती.
दरम्यान, शनिवार, दि. २७ रोजी निरंजन चव्हाण हा घरी असताना त्याच्या घरासमोर तोंडल येथील सूरज भोसले हा काही युवकांबरोबर पिकअप गाडी (एमएच ४२ एक्यू ४९३६) मधून येत जोरात मोठमोठ्याने गाणी लावत निरंजन चव्हाण याला शिवीगाळ केली. पिकअप गाडीमधून भरधाव वेगामध्ये गावातून दोन वेळा चकरा मारल्या. पिकअप गाडी भरधाव घेऊन जात असताना रस्त्यामधील दोन कुत्र्यांना उडवत ठार केले. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सूरज भोसले याने पुन्हा तीन दुचाकींवरून युवकांसमवेत निरंजन चव्हाण याच्या घरासमोर येत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोबत आणलेल्या छर्र्याच्या बंदुकीतून दोन वेळा फायरिंग करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत घटनास्थळावरून पोबारा केला. यावेळी घटनेची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, वृषाली देसाई यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. दरम्यान, सूरज भोसले याने वापरलेली पिकअप गाडी शिरवळ पोलिसांनी जप्त केली आहे. त्याचप्रमाणे सूरज भोसलेसह सहाजण फरार असून, शिरवळ पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत. याबाबतची फिर्याद निरंजन चव्हाण याने शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस हवालदार मदन वरखडे तपास करीत आहेत.
फोटो ३०शिरवळ
भोळी, ता. खंडाळा येथील गोळीबार प्रकरणानंतर शिरवळ पोलिसांनी पिकअप जीप जप्त केली आहे. (छाया : मुराद पटेल, शिरवळ)