फलटण : पुणे येथील श्रेयी इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड कंपनीच्या चौघांनी कर्जदारास थकीत हप्त्यापोटी चारचाकी गाडी आडवी मारून शिवीगाळ दमदाटी करत, ‘एक लाख रुपये दे नाहीतर येथेच मारून टाकतो,’ अशी धमकी केली. या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या चौघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत माहिती अशी की, अनिल जगन्नाथ शिंदे (वय ३२, रा.मठाचीवाडी, ता.फलटण) व त्यांचा मेहुणा रमेश बुधवर यांनी पोकलेन मशीनसाठी पुणे येथील श्रेयी इक्विपमेंट फायनान्स कंपनीकडून ४२ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. यातील काही हप्ते त्यांनी भरले होते. कोरोना परिस्थितीमुळे हप्ते थकित असताना ९ फेब्रुवारी रोजी फायनान्सचे पुणे येथील अधिकारी अरिंदम आचार्य, पंकज गायकवाड व अनोळखी दोघे त्यांच्या घरी आले.
‘तुमच्या नावावर न्यायालयाचे वॉरंट असून, तुम्हाला आमच्यासोबत पुण्याला यावे लागेल,’ असे सांगितले. अनिल शिंदे यांनी ‘मी माझ्या दुचाकीवर येतो, तुम्ही पुढे व्हा,’ असे सांगितले. शिंदे हे दुचाकीवरुन निघाले असता त्याच्या गाडीची चावी काढून त्यांना चारचाकीत जबरदस्तीने बसविले.यावेळी पंकज गायकवाड याने ‘तू आम्हाला ताबडतोब एक लाख रुपये दे, नाहीतर तुला येथेच मारतो,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ दमदाटी केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांनी धक्काबुक्की केली. त्यावेळी समोरून शिंदे यांचे चुलते व त्यांच्यासोबत दोन व्यक्ती आल्याचे पाहून फायनान्स कंपनीचे चौघे जण फलटणकडे निघून गेले. या घटनेची फिर्याद अनिल शिंदे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. हेडकॉन्स्टेबल रामदास लिमन तपास करीत आहेत.