सातारा : वाहतूक पोलिसाने ट्रीपलसीट अडविल्यानंतर दुचाकीस्वाराला तब्बल सात हजारांचा दंड भरण्याचे सांगताच संतापलेल्या दुचाकीस्वाराने पळत जाऊन डिझेल आणले. यानंतर पोलिसासमोरच अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना आज, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास सातारा बसस्थानकासमोर घडली.याबाबत अधिक माहिती अशी, वाहतूक पोलीस सोमनाथ शिंदे हे सातारा बसस्थानकाशेजारी सेव्हन स्टार इमारतीसमोर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एक युवक दुचाकीवरून ट्रीपलसीट आला. त्याला अडविल्यानंतर हवालदार शिंदे यांनी त्याला लायसन्स मागितले. मात्र, त्याच्याकडे लायन्सस नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी त्याला लायन्सस नाही म्हणून पाच हजार तर ट्रीपलसीट होता म्हणून एक हजार आणि गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे ५०० तसेच मोठा हाॅर्न लावल्यामुळे १०० असा जवळपास साडेसात हजार रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले.यावरून संबंधित दुचाकीस्वाराने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी हवालदार शिंदे यांनी त्याला ट्रीपलसीट असल्यामुळे कमीत कमी १ हजार रुपये तरी दंड भरावाच लागेल, असे सांगितले. याचा राग आल्याने तो पळतच भूविकास बॅंकेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर गेला. तेथून कॅनमधून डिझेल घेऊन परत तेथे आला. शिंदे यांच्यासमोरच त्याने डिझेल अंगावर ओतले. मात्र, काडी पेटविण्याआधीच त्याला नागरिकांनी पकडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसाने ट्रीपलसीट अडवले, दंड ऐकताच दुचाकीस्वार भलताच संतापला; अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 4:33 PM