सातारा : लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाले असून अंमलात आल्यास विधानसभेचेही मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही दोन मतदारसंघात महिला आरक्षण पडण्याचा अंदाज आहे. यामुळे याचा फटका जिल्ह्यातील मातब्बरांना बसणार असून राजकीय कारकिर्दीवरही परिणाम होणार आहे. तर काही ठिकाणी नेते ‘साैं’ ना निवडणुकीत उतरवणार हे निश्चित असल्याने आमदारकी घरातच ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.राजकारणात महिलांची संख्या अजूनही कमी आहे; आताच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक ठेवण्यात आले होते. लोकसभेत या विधेयकाला बहुमताने मंजुरी मिळालेली आहे. अजुनही या विधेयकाला पुढील प्रवास असणार असून सर्वत्र मंजूर झाल्यास त्याची अंमलबजावणी होईल. पण, अंमलबजावणी २०२४ का २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, एक समोर आले आहे की, ३३ टक्के महिला आरक्षणाने लोकसभेबरोबरच विधानसभेचे मतदारसंघही महिलांसाठी राखीव होणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातीलही आठपैकी दोन तरी विधानसभा मतदारसंघ राखीव होऊ शकतात.सातारा जिल्ह्यात पूर्वी विधानसभेचे १० मतदारसंघ होते; मात्र २००९ च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी आठच मतदारसंघ राहिले. यामध्ये सातारा-जावळी, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर, तसेच पाटण, माण, फलटण, कोरेगाव, वाई हे मतदारसंघ अस्तित्वात आले. मागील तीन निवडणुका या पुनर्रचित मतदारसंघात झाल्या आहेत. यातील फलटण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे; पण आता ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून जिल्ह्यातील आणखी दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव होऊ शकतात.
मतदारसंघ कोणता आरक्षित; त्यावर ठरणार महिला उमेदवार...जिल्ह्यात गेल्या ५० वर्षांचा विचार करता फक्त दोन महिलाच आमदार झालेल्या आहेत. आरक्षण प्रत्यक्षात लागू झाल्यास जिल्ह्यातील दोन मतदारसंघातही महिलाराज येणार आहे. हे मतदारसंघ कोणते हे स्पष्ट नाही; पण कोणतेही मतदारसंघ आरक्षित झाले तर तेथील मातब्बरांना घरीच बसण्याची वेळ येणार आहे. तरीही हे मातब्बर कुटुंबातील महिलांना निवडणुकीत उतरविणार हे स्पष्ट आहे. सातारा मतदारसंघात आरक्षण पडल्यास वेदांतिकाराजे भोसले या निवडणूक लढविण्याचा अंदाज आहे.
माण विधानसभा मतदारसंघात आरक्षण पडल्यास आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या निवडणुकीत असू शकतात. फलटण मतदारसंघात अनुसूचित जातीचे आरक्षण रद्द होऊन महिला आरक्षण पडल्यास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर तसेच भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची पत्नी अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर या निवडणूक लढवू शकतात. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात आरक्षण पडल्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पत्नी सुनीता कदम निवडणूक लढवू शकतात.