सातारा : जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेले प्रकरण २५ हजार रुपये देऊन मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मेढा पोेलिसांनी दिलेली माहिती अशी की, जावळी तालुक्यातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केला होता. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी बबन ऊर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ याला अटक केली होती. हे प्रकरण २५ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून मिटविण्याचा प्रयत्न सुरू होता. असा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुलकर, अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर अशी संबंधितांची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेले पाचजण हे राजकीय व प्रतिष्ठीत गावपुढारी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही संशयिताने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्थानिक पातळीवर संशयिताला समजही देण्यात आली होती. आता हे प्रकरण मिटविण्यासाठी पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल खराडे यांनी भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तर मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने हे तपास करत आहेत.