प्रगती जाधव-पाटील
सातारा : अस्वच्छ शौचालय, स्वच्छतागृहात पाण्याची अनुपलब्धता आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर करताना वाटत असणारी असुरक्षितता या काही कारणांमुळे नैसर्गिक विधी रोखण्याचा प्रयत्न महिला करतात. तरुणपणात केलेले हे कृत्य पुढे सवयीचे बनत जाते; पण त्याचे दुष्परिणाम उतार वयात सोसावे लागतात. नैसर्गिक विधी रोखल्याने अवयवांवरील नियंत्रण सुटण्याचे आणि ते निकामी होण्याचे प्रकारही वाढले आहेत.
कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या महिलांना नैसर्गिक विधीला जावे वाटले तरीही त्यांना शाैचालयांची व्यवस्था नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घरी जाईपर्यंत महिलांची कुचंबणा होते. याचीच सवय पुढे लागत असल्याने त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. शरीरात साठलेली घाण मल, मूत्र आणि घामावाटे बाहेर पडते. घाण बाहेर पडल्यामुळे शरीराची अंतर्गत शुद्धी होण्यासही मदत मिळते.
प्राण्यांचे वर्तन अनुकरणीय!
नैसर्गिक विधी करण्याची भावना जागृत झाल्यानंतर स्थळ, वेळ, काळ याचे कोणतेही भान न ठेवता प्राणी स्वत:ला हलके करतात. तर जोवर रोखता येतंय तोवर रोखण्याकडे मनुष्यांचा कल राहतो. नैसर्गिक विधीबाबत मनुष्यांनी प्राण्यांचे अनुकरण केले तर त्यांना अवयव निकामे होण्याचा त्रास होणार नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
युरिन इन्फेक्शनपेक्षा वेग रोखणं धोक्याचे!
अस्वच्छ शौचालय वापरल्याने योनीमार्गात जंतुसंसर्ग होण्याची धास्ती अनेक महिलांना असते; पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार संसर्गापेक्षा वेग रोखणं अधिक धोक्याचे आहे. संसर्गावर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. मात्र, वेग रोखल्याने स्नायूंचे होणारे नुकसान भरून न येणारे आहे.
नैसर्गिक विधी रोखणं हे निसर्गचक्राच्या विरुद्ध वागणे आहे. तरुणपणात केलेल्या या चुकांचे परिणाम शरीराला उतार वयात सोसावे लागतात. वाढत्या वयात नैसर्गिक विधींवरील नियंत्रण सुटणे, स्नायूंची नियंत्रण क्षमता कमी होण्याचे त्रास आढळून येतात. - डॉ. जयदीप चव्हाण, सातारा