फलटण : फलटण शहरासह तालुक्यात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली तसेच अनेक भागांत गारपीटही झाली. फलटण शहरात तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. तसेच रस्तेही जलमय झाले होते.
फलटण परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. फरांदवाडी, कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, धुळदेव, चौधरवाडी या भागांत पावसाचा जोर अधिक राहिला. यावेळी जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. तर तालुक्यातील काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे काही वेळेतच रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते तर गारा गोळा करण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली होती. दोन तासांहून अधिकवेळ पाऊस सुरू होता. यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय होऊन वाहत होते. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. तर वादळी वारा सुटताच शहरासह उपनगरांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सायंकाळी साडे पाचच्या सुमारासच मोठा काळोख पसरल्याचे चित्र होते. गारपिटीमुळे कांदा, आंबा, मका या पिकांचे नुकसान होणार आहे.
फोटो