सातारा : सातारा शहर व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास जवळपास १० मिनिटेच पाऊस झाला; पण पावसाचा जोर असल्याने गटारे भरुन वाहत होती. तर सखल भागात पाणी साचून राहिले होते.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील कमाल तापमान कमी झाले असून उकाडाही कमी होण्यास मदत झाली आहे. सातारा शहर व परिसरात तर मागील तीन दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. गुरुवारी जवळपास एक तासभर पाऊस पडला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साडेपाचनंतर पाऊस झाला.
ढगाच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघे १० मिनिटेच पाऊस पडला. पण या पावसामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. तर सखल भागात पाणी साचले होते. सायंकाळी सहानंतर पाऊस उघडला होता; मात्र रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण तयार होते.
फोटो जावेद रेन
साताऱ्यात सदर बाजार येथील समाजकल्याण कार्यालयाजवळ पावसाचे पाणी साठून आल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. (छाया : जावेद खान)