प्रमोद सुकरे
कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. तिन्ही पॅनलचे उमेदवार प्रचारात सक्रिय दिसत आहेत. पण त्यांना सभासद मतदारांच्या मनाचा थांगपत्ता लागताना अडचणी येत आहेत. अनेक संधिसाधू कार्यकर्ते तर अजूनही तटस्थच आहेत. रयत व संस्थापक पॅनलच्या आघाडीच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष असून चालत्या गाडीत बसण्याची त्यांची भूमिका दिसत आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात सभासद असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 29 जून रोजी होत आहे. मतदार यादी प्रसिद्धी, अर्ज दाखल करणे प्रक्रिया, छाननी हे सोपस्कार पूर्ण झाले असून 17 जूनपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल पुन्हा रिंगणात उतरले आहे. त्याविरोधात डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल यांनी अर्ज दाखल केले असून उमेदवार प्रचारालाही लागलेले आहेत.
दुसऱ्या बाजूला गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेली डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या आघाडीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, ॲड. उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत आजही बैठका होत आहेत. दोन्ही माजी अध्यक्ष मोहिते आघाडीबाबत आशावादी असल्याचे कार्यकर्त्यांना सांगत आहेत तर पृथ्वीराज चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसे संकेत दिले आहेत. मात्र अजूनही अंतिम निर्णय न झाल्याने काठावरचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
आघाडी झाली तर कृष्णात पुन्हा एकदा चमत्कार होईल असा अंदाज काहीजण बांधत आहेत. त्यामुळे आपण कोणत्या पॅनेलचा प्रचार करायचा? कुठे सक्रिय व्हायचं? कुणाला मतदान द्यायचं, याचा निर्णय अजूनही संधिसाधू कार्यकर्त्यांनी घेतलेला दिसत नाही. जे पॅनेल विजयी होण्याची शक्यता जास्त त्या पॅनेलमध्ये सक्रिय व्हायचा त्यांचा मानस दिसत आहे. एकास एक लढत निवडणूक रिंगणात झाली तर निकाल काहीही लागू शकतो असे वाटत असल्याने आघाडीचा निर्णय कधी होणार त्याकडे त्यांचे कान व डोळे लागलेले आहेत.
दरम्यान या आघाडीसाठी मुंबई, कोल्हापूर, कराड, पुणे आदी ठिकाणी आठ ते नऊ बैठका झालेल्या आहेत. चर्चा सकारात्मक असून बऱ्यापैकी उमेदवार निश्चित झाल्याचे निकटवर्तीय सांगतात. पण अर्ज दाखल होऊन ते माघार घेण्याची सुरुवात झाली तरी याबाबतची अधिकृत घोषणा का होत नाही, हा सभासदांच्या मनात प्रश्न आहे.
आतातर रयत व संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे काठावर असणारे लोक अजुनही तटस्थ दिसत असून त्यांची द्विधा मनस्थिती दिसत आहे. येत्या काही दिवसात त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. म्हणून तर आघाडीच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष दिसत आहे.
चौकट
राष्ट्रवादीचे नेते दिसेनात ..
रयत पॅनेलचे नीते डॉ. इंद्रजित मोहिते हे कॉंग्रेस विचाराचे आहेत तर संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. या दोन्ही पॅनेलच्या एकत्रीकरणासाठी काँग्रेसचे नेते पुढे दिसतात. पण राष्ट्रवादीचे नेते कुठेच दिसत नाहीत. याचीही चर्चा कृष्णेच्या सभासदांच्यात सुरू आहे.