औंध : मुसळधार पावसात औंध संगीत महोत्सवाची रंगत वाढत जाण्याबरोबरच कथ्थक नृत्यांगना गौरी स्वकूळ यांच्या अप्रतिम पदन्यासांनी मनाचा ठाव घेत उपस्थित हजारो रसिकश्रोत्यांना खिळवून ठेवले. स्वकूळ यांनी शिवपार्वती स्तुती, त्यानंतर झपतालामध्ये तालांग, भावांगामध्ये ठुमरी, तत्कार आणि हंसध्वनीमधील सरगम सादर केली.
औंध, ता. खटाव येथे संगीत महोत्सव झाला. पंडित गजानन बुवा यांची नात आणि जोशी घराण्याचा गायकीचा वारसा पुढे चालवत असलेल्या पल्लवी जोशी यांनीही मैफील रंगविली. पल्लवी यांनी पंडित गजानन बुवा जोशी, चुलते मधुकर जोशी, आत्या सुचेता बीडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे.
केंद्र सरकारच्या संगीत शिष्यवृत्तीच्या त्या मानकरी असून, मधुमालती आणि रायझिंग स्टार्स शास्त्रीय संगीताचे अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. देश-विदेशात त्यांनी गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. सुरुवातीला त्यांनी राग मुलतानी सादर केला. यामध्ये ताल झुमरा व कवन देस गईलवा हा बडा ख्याल पेश केला. त्यानंतर त्यांनी राग देस आळवला. मध्यलय, तीनतालमध्ये सखी घन गरजत सादर केला. त्यानंतर पंडित अरुण कशाळकर यांनी कला सादर केली.
तिसºया सत्राची सुरुवात अपूर्वा गोखले यांच्या बहारदार शास्त्रीय गायनाने झाली. यावेळी त्यांनी राग जोग बडा ख्याल विलंबित तीन ताल पिहरवा को बिरमाए, छोटा ख्याल तीन ताल कैसे कैसे कटे तराणा, द्रुत तीन ताल पेश केला. यावेळी रसिकश्रोत्यांनी त्यांच्या गायनाला भरभरून दाद दिली. त्यानंतर उत्तर रात्री उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी रुद्रवीण्यावर राग तीलककामोद वाजविला. ओजस अधिया यांनी एकल तबलावादन करीत तीनताल सादर केला.
या संपूर्ण कार्यक्रमात तबल्यावर स्वप्नील भिसे, प्रवीण करकरे तसेच संवादिनीवर चैतन्य कुंटे, चिन्मय कोल्हटकर यांनी साथ दिली.या कार्यक्रमाचे अनुष्का फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. संगीत महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार, प्रसाद कुलकर्णी, मातोंडकर, काटदरे, औंध ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ व विविध मान्यवर संस्थांनी सहकार्य केले.