रशिद शेखपुसेसावळी/औंध : राजाचे कुर्ले ता खटाव येथील डोंगरपायथ्याजवळ एका कपंनीने कामासाठी ठेवलेल्या लोखंडी पोलची चोरी करणाऱ्या सात संशयितांना औंध पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तनवीर अल्ली पटेल (वय ३१ रा. वाघेरी. ता. कराड), मुबीन युनूस पटेल (२७ रा. ओगलेवाडी ता. कराड), गौरव अंकुश वाघमारे (२३), सागर राजाराम वाघमारे (३०), सागर दत्तात्रय कुंभार (२५ तिघेही रा.वडोली निळेश्वर ता. कराड), सुनील ताराचंद चव्हाण (२० रा. उत्तरकार्ले ता. कराड), दीपक राजेंद्र सोनवणे (२९रा. मसूर ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, ८ नोव्हेंबर रोजी रात्री राजाचे कुर्लेच्या डोंगरपायथ्याजवळून दोन लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे लोखंडी पोल चोरीला गेल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी गतिमान तपास करीत संशयित तनवीर अली पटेल (रा. वाघेरी ता. कराड) यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पटेल याने याप्रकरणात अन्य सहा जणांचा सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर औंध पोलिसांनी अन्य सहाजणांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली टाटा ट्रक, ट्रेलर, पीकअप, दुचाकी,गॅस कटर, सिलिंडर,ऑक्सिजन सिलिंडर,७ मोबाईल आणि चोरीला गेलेले लोखंडी पोल असा एकूण ३० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठीकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस हवालदार राहुल वाघ, रवींद्र बनसोडे, महेश जाधव यांनी पार पाडली.
Satara: लोखंडी पोल चोरणाऱ्या सात जणांना अटक, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 7:15 PM