औंध : औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रोत्सवानिमित येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याजवळील कुस्ती मैदानात कुस्त्यांचा जंगी आखाडा मंगळवार, दि. २९ रोजी आहे. यावेळी १ लाख ५१ हजार रुपये इनामासाठी हिंदकेसरी विकास जाधव आणि यूपी केसरी पवन दलाल यांच्यात काट्याची टक्कर रंगणार आहे. कुस्ती आखाड्याची तयारी पूर्ण झाली आहे.औंध येथील कुस्ती मैदानास ऐतिहासिक परंपरा आहे. औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी श्रीमंत राजेसाहेब तालीम संघाच्या माध्यमातून औंधमध्ये सशक्त व बलदंड पिढी घडविण्याचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. यंदा श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, ग्रामस्थ औंध व श्रीमंत बाळराजे तालीम संघ औंध, ग्रामपंचायत औंध यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.मैदानात एक लाख इनामासाठी गोकूळ वस्ताद तालीम पुणे येथील भारत मदने व मोतिबाग कोल्हापूर येथील संतोष दोरवड यांच्यामध्ये लढत होणार आहे. ७५ हजार रुपये इनामासाठी गंगावेशचा तुफानी मल्ल सिकंदर शेख आणि बाळू तनपुरे परस्परांशी भिडणार आहेत. याशिवाय आणखीही नेत्रदीपक अटीतटीच्या कुस्त्यांचा थरार यावेळी मैदानात रंगणार आहे.छोट्या गटातील कुस्त्यांची नोंदणी श्री यमाई मंदिरात सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत केली जाणार आहे. कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रमेश जगदाळे, सदाशिव पवार, वसंत माने, वसंत जानकर, सदाशिव इंगळे, किसन आमले, नारायण इंगळे, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, प्रशांत खैरमोडे, इलियाज पटवेकरी, सचिन शिंदे, बापूसाहेब कुंभार, दीपक नलवडे, संजय निकम, किसन तनपुरे, कुलदीप इंगळे व तालीम संघाचे सदस्य, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.प्रेक्षक गॅलरी सुसज्ज..कुस्त्यांच्या आखाड्याची ३५ फूट त्रिज्या, ७० फूट व्यास, प्रमुख पाहुण्यांना खास बैठक व्यवस्था, मल्लाना ड्रेसिंग रुमची व्यवस्था, सुमारे २५००० प्रेक्षक बसतील एवढी व्यवस्था करण्यात आली आहे. मागील वर्षी आलेल्या कुस्तीशौकिनांची गर्दी लक्षात घेता यंदा त्यापेक्षाही नेटके नियोजन करण्यात आले आहे.
औंधला आज हिंदकेसरी विरुद्ध यूपीचा मल्ल यांच्यात लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:32 PM