औंध : औंध आणि परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, औंध ग्रामपंचायत, ग्रामस्थ, व्यापारी यांनी दि. २० एप्रिलपासून सुरू केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ची ग्रामस्थांनी कडक पालन केल्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उद्रेक काही प्रमाणात टाळता येणे शक्य झाले आहे. हा १२ दिवसांचा कडक लॉकडाऊन १ मेपर्यंत पाळला जाणार असल्याची माहिती सरपंच सोनाली मिठारी व उपसरपंच दीपक नलवडे यांनी दिली.
औंध हे आजूबाजूच्या बहुतांशी खेड्यांचे खरेदीचे केंद्र आहे. किराणा, शेतीपूरक साधने, बँका, सर्व शासकीय कार्यालये ही औंधला असल्याने आजूबाजूच्या लोकांचे सतत येणे-जाणे सुरू असते. एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर औंधला कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढू लागला. त्यामुळे सकाळी ७ ते ११ पर्यंत असणारी दुकाने व अन्य सेवा यामुळे संख्या वाढतच चालल्याचे लक्षात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थांनी कोरोनाला हरविण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गाव कडकडीत बंद ठेवले.
औंधच्या आजूबाजूच्या गावातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचा फटका औंधला बसत होता. आजअखेर औंध गावात १४२ रुग्ण आहेत. त्यापैकी ४० जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर १०० रुग्ण उपचार घेत आहेत. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे एवढ्या संख्येवरच कोरोनाला थोपविता आले. त्यामुळे अजून १ मेपर्यंत औंध ग्रामस्थ कडकडीत बंद ठेवून कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
(चौकट)
लस घेण्यासाठी मानसिकता करण्यासाठी प्रयत्न
औंधमधील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण व्हावे, यासाठी पदाधिकारी घरोघरी जाऊन लसीचे फायदे समजावून सांगत आहेत; तर लसीविषयी असणारे गैरसमज दूर करून त्यांना महत्त्व पटवून देत आहेत.
२९औंध
फोटो : औंध ग्रामपंचायत पदाधिकारी सध्या लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहेत आणि लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. यावेळी शैलेश मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)