औंध : औंध परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील प्रमुख ज्वारीसह इतर पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच तोडणीसाठी आलेल्या ऊस पिकाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाने पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.खटाव तालुक्यातील ज्वारी हे पीक रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. या पिकातून ज्वारीही मिळते आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्थाही होते.
अशा दोन्ही गोष्टींचा शेतकरी मेळ घालण्यासाठी हे पीक मोठ्या कष्टाने पिकवतो. मात्र, अवकाळी पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी सुन्न झाला आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारीबरोबरच गहू, हरभरा आणि उसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पडल्याने उत्पन्नात घट होणार आहे.
अगोदरच कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अवकाळीच्या संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटणार आहे. सरकारने पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- रमेश जगदाळे, चेअरमन,औंध विकास सेवा सोसायटी.