सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केलेले आहे. त्यापूर्वी संचारबंदी होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वगळता सर्वच मंडळी घरात बसून होती. त्यामुळे वीज, नळ मीटर रीडिंगसाठी येणाऱ्यांना ग्राहकांचे घर बंद असण्याचे कारणच नाही. तरीही शाहूपुरीतील असंख्य ग्राहकांना मार्चसाठी आलेल्या नळ बिलावर मीटरची स्थिती ‘लॉक’ अशी दिली आहे. त्यामुळे सरासरी बिले दिली असली तरी ग्राहकांना विनाकारण भुर्दंड बसणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये झाला. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तब्बल दिवाळीपर्यंत सुमारे सहा ते सात महिने कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्याच काळात वीज कंपनीने रीडिंग थांबविले होते. सरासरी बिले दिल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आवाक्याबाहेर बिले आली होती. ती अजूनही काहींना भरता आलेली नाहीत. हा अनुभव असल्याने ज्या त्या महिन्यात बिले आली तर आवाक्यात रक्कम येऊ शकते. त्यासाठी मीटर रीडिंग घेणाऱ्यांनी ग्राहकांच्या दारात जाणे गरजेचे आहे.
राज्य शासनाने कडक लॉकडाऊन लागू केलेला असला तरी आरोग्य, स्वच्छता, वीज, पाणीपुरवठा विभागाचा समावेश अत्यावश्यक सेवेत केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी ग्राहकांच्या दारात गेले तर त्यांना कोणीही अडविणार नाहीत. मात्र, हे कर्मचारीच घरी येत नसल्याचा काही ग्राहकांतून आरोप केला जात आहे. बहुधा त्यामुळे अनेकांच्या बिलावर ‘लॉक’ असा उल्लेख आलेला आहे. त्याचा फटका मात्र ग्राहकांना विनाकारण बसणार आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट :
किमान मुले तरी घरातच होती...
नळाचे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी आले तेव्हा एकवेळ काही कामानिमित्त मोठी माणसे घराबाहेर गेली असतील, असे समजले तरी शाळा बंद असल्याने मुले घरातच होती. कोरोनाची दहशत असल्याने मुलांना बाहेर सोडलेच जात नव्हते. त्यामुळे घराला कुलूप लावलेले असणे शक्यच नव्हते. तरीही बिलावर ‘लॉक’ असा उल्लेख कसा आला असावा, हे ग्राहकांना समजत नाही.
कोट :
कधी तरी एकदा रीडिंग घेऊन ग्राहकांना दंडाच्या रकमेसह जादा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. संबंधित ग्राहक घरात असतानाही हा प्रकार होणे योग्य नाही. याप्रकरणी वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी.
- भारत भोसले,
शाहूपुरी, सातारा.
फोटो
१४शाहूपुरी वॉटर बिल
शाहूपुरी परिसरातील असंख्य ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून देण्यात आलेल्या आलेल्या ‘लॉक’ असा उल्लेख केला आहे.