प्रगती जाधव- पाटील ।सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीला अभिवादनासाठी ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची उपस्थिती ठरलेलीच... मात्र याला यंदा कोरोनाने छेद दिला. गेल्या ३१ वर्षांनंतर प्रथमच साताऱ्यातील या कार्यक्रमास ते शनिवारी अनुपस्थित राहिले. त्यांची ही अनुपस्थिती रयत परिवाराला प्रकर्षाने जाणवली. या कार्यक्रमात रयतच्या स्वायत्त विद्यापीठाची घोषणा अपेक्षित होती. परंतु कार्यक्रमच रद्द झाल्यामुळे स्वायत्त विद्यापीठाची घोषणा रखडली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे खेडोपाड्यासह शहरातील बहुजन समाजातील हजारो मुलांनी शिक्षण घेतले. रयतमध्ये शिक्षण घेतलेली हजारो मुले जगाच्या कानाकोपºयात आज उच्च पदावर काम करीत आहेत. रयत शिक्षण संस्थाही आधुनिकतेचा स्वीकार करीत वाटचाल करीत आहे. ९ मे हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन. यादिवशी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कर्मवीरांना आदराजंली वाहिली जाते. यानंतर संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक होते.
या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेतले जातात, नव्या योजना, नवे उपक्रम जाहीर केले जातात. राज्यभरातून रयत सेवक व प्रमुख पदाधिकारी या समारंभाला हजेरी लावतात. गेली ६१ वर्षे ही परंपरा सुरू आहे. ज्येष्ठ नेते व रयतचे आधारस्तंभ शरद पवार हे कर्मवीरांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला आदल्या दिवशी साताºयात येतात. ९ मेच्या रयतच्या सर्व बैठकात सहभागी होतात. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा पदावर असताना देखील पवार हे साता-यात येतात.
गेली ३१ वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रयतने सर्व कार्यक्रम रद्द केले. पवार यांची अनुपस्थिती रयत परिवाराला प्रकर्षाने जाणवली.कोरोना संकटामुळे कर्मवीरांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी करण्यात आली.
मान्यवरांची मांदियाळीरयत शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या ६१ वर्षांत कर्मवीरांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू आहे. यासाठी १९६० ते १९८३ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, १९८४ ते १९८८ वसंतदादा पाटील आणि त्यानंतर १९८९ ते २०१९ असे सलग ३१ वर्षे शरद पवार यांची उपस्थिती लाभली आहे. कर्मवीरांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करणासाठी देश-विदेशात पसरलेले रयत सेवक येतात.
कर्मवीर अण्णाची पुण्यतिथी म्हणजे आम्हा रयत परिवारासाठी कृतज्ञता सोहळा असतो. आजच्या दिवशी हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केला याच्या वेदना खूपच आहेत. शुक्रवारची पूर्ण रात्र मी एक मिनिट ही झोपू शकलो नाही. ही अस्वस्थता वेदनादायी आहे; पण मानवा पुढील संकट फारच मोठं आहे.- अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या आवारातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, अॅड. दिलावर मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.