सागर गुजर
सातारा : मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. साताºयातील प्रमुख चौकांमध्ये मंगळवारी शिट्टीचा आवाज येत होता. पोलीस अधीक्षकांच्या परिपत्रकामुळे वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर दिसणे दुर्मीळ झाले असताना शिट्ट्या कोण मारतंय, हे पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना एक सहा फुटांचा धिप्पाड देह नजरेस पडला. अंगात पांढरा सदरा आणि लेंगा घातलेला! या संपूर्ण पोषाखावर मतदान जागृतीचा संदेश लिहिलेला पाहायला मिळत होता. डोक्यात टोपी त्यावरही मतदान करा, असा संदेश लिहिलेला. तेच बापूराव गुंड! शिट्टी वाजवून ते लोकांचे लक्ष वेधून घेत होते. मतदान करा, असा संदेश ते देत होते.
पुण्यातील फुरसुंगीपासून या अवलियाने बाईकवरून प्रवास सुरू केला आहे. बाईकवरही मतदान जागृतीचे संदेश जागोजागी लिहिलेले पाहायला मिळत होते. गेल्या ३५ वर्षांपासून बापूराव गुंड यांनी मतदान जागृतीचा प्रयोग स्वखर्चातून सुरू केला आहे. गुंड हे कापड विक्रेते आहेत. मात्र निवडणुकांत मतदानाचा घटलेला टक्का त्यांच्या जिव्हारी लागला. सरकार निवडताना सर्वच जनतेने पुढे यावं, असं त्यांचं मत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा तसेच लोकसभा या सर्वच निवडणुकांमध्ये ते मतदान जागृतीसाठी घराबाहेर पडतात.
गुंड यांच्याकडे असणाºया बाईकमध्ये ते स्वत:च्या खिशातील पैशाने पेट्रोल टाकतात. मंगळवारी ते पुण्यातून जागोजागच्या गावांत मतदान जागृती करत साताºयात आले होते. साताºयातून ते कºहाड, कोल्हापूरकडे जाणार होते. ३० ते ३५ दिवसांच्या दौºयात बसस्थानक, मंदिरात ते मुक्काम करतात. दुसºया दिवशी पुन्हा ‘आय विल ओट...तुम्हीही मतदान करा,’ असा संदेश देत प्रवास करतात.
तेव्हाच प्रवास थांबेल
जोपर्यंत देशात ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत १०० टक्के मतदार मतदान करणार नाहीत, तोपर्यंत ही जागृतीची मोहीम सुरूच ठेवणार आहे, असे बापूराव गुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा, चोख कर्तव्य पार पाडा, प्रत्येक निवडणुकीत ६० ते ७० टक्के मतदान होते. बाकीचे ४० टक्के लोक मतदान करत नाहीत. त्यामुळे लोकांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी मी ३५ वर्षांपासून असा पोषाख घालून प्रचार करतो आहे.- बापूराव गुंड, फुरसुंगी (पुणे)