सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था आणि त्यातून प्रवास करताना प्रवाशांचे होणारे हाल याविषयी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी विविध स्तरावर पत्रव्यवहार केला होता.
तसेच भेटी घेऊन प्रशासनाकडे दादही मागितली होती. तर गत महिन्यात याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी वेळ मागून घेतली होती. तरीही निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याने हे आंदोलन करण्यात आले.बुधवारी सकाळी साडेअकराला आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत टोलनाक्यावरील वसुली बंद केली. यावेळी सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, अविनाश कदम, अमोल मोहिते, कांचन साळुंखे, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.