प्रमोद सुकरे - कऱ्हाड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे़ सत्ताधारी संचालक मंडळाच्या कार्यकालातील शेवटचा गळीत हंगाम शुभारंभ रविवारी होत आहे़ हेच टायमिंग ओळखून अविनाश मोहितेंनी कार्यक्रमाला अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांना एकत्रित निमंत्रित करून बेरजेच्या राजकारणाचा ‘शॉट’ मारण्याचे संकेत दिलेत़ त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे़ ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा अन् सांगली जिल्ह्यात आहे़ कारखान्याच्या सत्तेचा अन् निवडणुकीचा नजीकच्या ३/४ विधानसभा मतदारसंघांवर परिणाम होत असतो़ आता नजीकच्या काळात ‘कृष्णे’चा रणसंग्राम सुरू होणार असून, त्याची तयारी सध्या सुरू झाली आहे़ कोणी पडद्याआडून तर कोणी उघड-उघड बांधणी करतंय; तर ‘दादा’ मंडळींचा गनिमी कावाही सुरू आहे म्हणे! विधानसभेचा धुरळा आता खाली बसला आहे; पण नजीकच्या काळात कृष्णेच्या निवडणुकीचं गुऱ्हाळ सुरू होणार आहे़ त्यातून व्यवस्थित रस बाहेर पाडण्यासाठीच चेअरमन ‘दादां’नी थेट बारामतीच्या ‘दादां’ना मोळी टाकायला बोलावलंय, त्यांच्या हस्तेच कृष्णेची निवडणुकीची मोळी बांधण्यासाठी बाळासाहेब अन् उंडाळकरांनाही बोलवल्याची चर्चा आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अन् दिवंगत यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले परिवाराचा स्रेह नेहमीच राहिला आहे़ ‘भाऊ’ आजारी असताना शरद पवारांनी रेठरे बुद्रुकला घरी जाऊन त्यांची विचारपूस केली होती़ डॉ़ इंद्रजित मोहिते चेअरमन असताना सन २००८ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ‘कृष्णे’वर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेले होते; पण अजितदादा प्रथमच कृष्णेवर येत आहेत, तेही अविनाशदादांच्या निमंत्रणावरूऩ निवडणूक जवळ येत असताना या घडामोडी होत आहेत. मग चर्चा तर होणारच!४कऱ्हाड दक्षिणेत राष्ट्रवादीला सक्षम नेतृत्व सध्यातरी दिसत नाही़ त्यामुळे घड्याळाचे काटे इथे स्तब्ध झाले आहेत; पण अविनाश दादांनी याच घड्याळात सध्या अचूक वेळ बघितली असून, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अजितदादा त्यांच्या हातात ‘घड्याळ’ बांधणार काय ? अशी ही चर्चा सध्या सुरू आहे़ तिघे बोलणार का ?नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विलासराव पाटील-उंडाळकरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा पत्रकावर दिसत होता; पण प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या स्थनिक नेत्यांनी पाठिंबा न दिल्याचा आरोप उंडाळकरांनी जाहीररीत्या केला आहे़ त्यामुळे रविवारच्या कार्यक्रमात उंडाळकर, बाळासाहेब अन् अजितदादा काय बोलणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे़ विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळातील हा शेवटचा गळीत हंगाम आहे़ त्याच्या शुभारंभाला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार आहेत़ आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अविनाशदादा, अजितदादांसमोर शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे़
अविनाश मोहितेंचा ‘टायमिंग शॉट’
By admin | Published: November 20, 2014 9:40 PM