वाई : मुदत संपूनही ठेवीची रक्कम माजी सैनिकाला परत केली नाही. याप्रकरणी रामानंद मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे चेअरमन विश्वास शिंदे, जनता अर्बन बॅँकेचे चेअरमन सुरेश कोरडेंसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाई न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, सिद्धनाथवाडी येथील सचिन लक्ष्मण पोळ या माजी सैनिकाने अल्प मुदतीसाठी साडेआठ लाख रुपयांची ठेव पावती जानेवारी २०२० मध्ये रामानंद मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी, जनता अर्बन बँकेचे चेअरमन सुरेश दिनकर कोरडे, रामानंद मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे चेअरमन विश्वास बजरंग शिंदे, व्हाइस चेअरमन भावेश शांताराम मांडलिक यांच्या सांगण्यावरून ठेवली होती. ठेव पावतीची मुदत संपल्यावर ते रामानंद मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीत गेले असता, त्यांना ती मिळाली नाही. ते तेथे गेले असता रामानंद मल्टिस्टेटची वाई शाखा बंद असल्याचे निदर्शनास आले. पोळ यांनी ठाणे येथील रामानंद मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीत जाऊन पैशांची मागणी केली असता त्यांच्या लक्षात आले की, या तिघांनी संगनमत करून फसवणूक केली आहे.
पोळ यांनी सुरेश कोरडे, विश्वास शिंदे व मांडलिक यांना फोन करून पैशाची मागणी केली असता ‘तुम्ही जीव दिला तरी तुमचे पैसे मिळणार नाही,’ असे उत्तर मिळाल्याने सचिन पोळ यांनी वाई पोलीस ठाण्यात धाव घेतली; परंतु पोलिसांनी कोरोनाचे कारण पुढे करीत तक्रार दाखल करून न घेतल्याने पोळ यांनी वाई न्यायालयात धाव घेतली.
वाई न्यायालयाने सचिन पोळ यांच्या तक्रारीची दखल घेऊन जनता अर्बन बँकेचे चेअरमन सुरेश कोरडे, रामानंद मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे चेअरमन विश्वास शिंदे, व्हाइस चेअरमन भावेश मांडलिक, संचालक हर्षल विश्वास शिंदे, प्रीतम भावेश मांडलिक, व्यवस्थापक मंगेश बाळकृष्ण पिसाळ, कर्मचारी कलगोंडा श्रीकांत कांबळे, अश्विनी राहुल पवार, स्वरदा चंद्रशेखर पाटणे, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश वाई पोलिसांना दिला.