मलकापूर : कलम १४४ व संचारबंदी लागू केली असताना मलकापुरात काही ठिकाणी नागरिकांचा राबता दिसत होता; तर शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत अनेक युवक दुचाकीवरून फिरत होते. अशा युवकांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला. शिवछावा चौक, शिवाजी चौक व मंडई परिसरात काही जणांना पोलिसांकडून दंडात्मक प्रसाद मिळाला. गांधीगिरीने प्रबोधनपर पोलिसांच्या कारवाईनंतर शहरातील फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.
सध्या सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता अनेक धाडसी निर्णय घेतले जात आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या या सर्व निर्णयांची मलकापुरातही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांसह पालिकेने कंबर कसली आहे. संपूर्ण राज्यात १४४ कलमासह संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. याची मलकापूर शहरात प्रभावी अंमलबजावणी व शासनाचे सर्व आदेश काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पोलीस प्रशासनाने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे शिवछावा चौकात उड्डाणपुलाखाली चेकपोस्ट लावले आहे. वेळोवेळी प्रमुख अधिकारी व पोलीस कर्मचारी शहरात फिरून गस्त घालत आहेत. असे असतानाही सकाळी १० वाजल्यापासून शहरातील शिवछावा चौक, आगाशिवनगर, शिवाजी चौक व मंडई परिसरात नागरिकांचा राबता होता, तर अनेक युवक दुचाकीवरून गिरट्या घालत होते.
शिवछावा चौकात येणाऱ्या प्रत्येकास थांबवून विचारपूस करण्यात येत होती. सबळ कारण न सांगितल्यास पोलिसी खाक्याचा दंडात्मक प्रसाद मिळत होता. अशा पद्धतीने पोलिसांनी शहरातील मुख्य ठिकाणी कारवाई केल्यावर दुपारनंतर रस्त्यावरील गर्दी कमी दिसत होती, तर पहिला दिवस म्हणून स्वतःच्याच काळजीसाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
चौकट
ग्राहकांअभावी शटर डाऊन
सरकारने बुधवारी रात्रीपासून संचारबंदी जाहीर केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बंद ठेवण्याचा आदेश आहे. मात्र, संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या काही दुकानदारांनी ग्राहकांअभावी दुपारनंतर शटर डाऊन केले.
चौकट
साहेब, औषध आणायला निघालोय
कराड शहरात पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे, अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस कारवाई करत आहेत. यावेळी अनेक जण साहेब, औषध आणायला निघालोय, अशा वेगवेगळ्या कारणांची यादीच पुढे करत होते.
चौकट
पोलीस दिसताच यू-टर्न
येथील शिवछावा चौकात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस कारवाई करत होते. काही युवक नेमके काय चालले आहे, हे बघण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडले होते. समोर पोलिसांना बघताच अनेकांच्या दुचाकीला तातडीने यू-टर्न बसत होता.
चौकट
नाशवंत मालाचे काय करायचे ही व्यथा
शासनाच्या आदेशानुसार फळविक्री व्यवसाय जीवनावश्यक व्यवसायाच्या यादीत आहे. येथील शिवछावा चौकातील संबंधित व्यावसायिकांनी माल घेऊन आल्यावर काही काळ दुकान सुरू करू नका म्हणून पोलिसांनी दटावले. शेवटी साहेब, या नाशवंत मालाचे काय करायचे, असा सवाल करताच नियम पाळून सुरू करा, असे सांगितले.
चौकट
गॅरेजमध्येच लायसन्स राहिले साहेब
पोलिसांनी दुचाकीला अडवताच दुचाकीस्वाराने कारणे सांगण्यास सुरुवात केली. गॅरेजमध्येच लायसन्स राहिले साहेब. साहित्य आणायला आलो होतो, असे सांगत फोनवरून खातरजमा करावी लागली.
चौकट
घरात बसण्यापेक्षा चौकात झाडाखाली बरं
शिवछावा चौकात काही रिक्षाचालकांनी गेटवरच ठाण मांडले होते. संचारबंदी आहे, मग प्रवासी आहेत का, असे विचारले असता घरात बसण्यापेक्षा चौकात झाडाखाली बरं, एखादी वर्दी मिळाली तर तेवढंच चार पैसे मिळतील, असे उत्तर मिळाले.