खंडाळा : सातारा-पुणे आशियाई महामार्गावरील खंडाळा ते शिरवळ परिसरातील अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी रस्ते वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर अवैध वाहतूक थांब्यावर नागरिकांचे प्रबोधन करून सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
खंडाळा तालुक्यातील महामार्गावर घाटातील एस वळण, खंडाळा उड्डाणपुलाचा वाहन थांबा, शिरवळ येथील उड्डाणपुलाजवळील वाहन थांबा हे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा व महामार्ग वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मोटार वाहतूक नियंत्रक विशाल घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये सहायक मोटार वाहतूक नियंत्रक सुप्रिया गावडे, नीलेश सावंत, जिल्हा वाहतूकचे भोसले, पोलीस हवालदार फरांदे, शेलार यांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत महामार्गावरील अपघात क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अपघात क्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजना, उर्वरित ठिकाणी करावयाच्या उपाययोजना, रस्ता दुभाजकासह रस्त्यावरील समस्या यांचा आढावा घेण्यात आला. तसेच अवैध बसथांब्याच्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या लोकांचे प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर महामार्गावर थांबणाऱ्या बसेस बसस्थानकात का जात नाहीत, याचीही माहिती घेण्यात आली. अवैध थांब्यावर आढळलेल्या वाहनांवर या पथकाकडून कारवाईही करण्यात आली. अपघात क्षेत्रात सुरक्षेबाबत राबविलेल्या या मोहिमेचे लोकांमधून कौतुक होत आहे.
२०खंडाळा
सातारा-पुणे आशियाई महामार्गावर उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा व महामार्ग वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात आली.