लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहर व परिसरात जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला. कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांबरोबरच सामान्य महिलांचा गौरव करून सर्वत्र हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक व्यावसायिकांनी या दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष सवलत आणि सूटही जाहीर केली.
मोठ्या शहरांत साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचे स्वागत निमशहरांबरोबरच ग्रामीण भागानेही केले. काही ठिकाणी महिलांना स्वयंपाकघरातून सुटी देऊन हा दिवस साजरा केला. महिलांनीही समाजमाध्यमांद्वारे या दिवसाचे औचित्य साधून परस्परांना शुभेच्छा आणि प्रोत्साहनपर उपक्रम राबविले.
साताऱ्यातील बहुतांश व्यावसायिकांनी या दिवसाच्या निमित्ताने महिला ग्राहकांना सवलत देण्याचे जाहीर केले. कोणी वस्तू खरेदीवर, तर कोणी खाद्यपदार्थांवर सवलत देऊन नारीशक्तीचा सन्मान राखण्यासाठी आपला वाटा उचलला.
कोट :
हॉटेल व्यवसाय सुरू केल्यापासून एकटी महिला येऊन कोणत्या पदार्थाचा आस्वाद घेऊन गेली हे चित्र कधी पाहायला मिळालं नाही. म्हणून यंदा आम्ही महिला ग्राहकांसाठी विशेष सवलत जाहीर केली. वर्षभर घरात राबणाऱ्या हातांना या दिवशी तरी आराम मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
- रोहित सावंत सरदार, हॉटेल व्यावसायिक