पळशी : ‘गावातील प्रत्येक जागरूक नागरिक हा साध्या वेशातील पोलीसच आहे. कोठे अन्याय होत असेल तर आपण जागरूक राहून पीडितांना मदत करावी. महिला व मुलींनी अन्याय व अत्याचार निमूटपणे सहन करू नये. अशावेळी पोलीस स्टेशन, निर्भया पथक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितींना तत्काळ माहिती द्यावी,’ असे आवाहन पोलीस अंमलदार तानाजी चंदनशिवे यांनी केले.
मार्डी येथे युवती आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शारीरिक व मानसिक अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार, असे गुन्हे रोखण्यासाठी निर्भया पथक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, सरपंच संगीता दोलताडे, उपसरपंच संजीवनी पवार, ग्रामपंचायत सदस्या, बचत गटातील महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, नितीन सजगणे, रमेश बर्गे आदी उपस्थित होते.
सोनाली पोळ म्हणाल्या,‘लॉकडाऊनमध्ये मुलांमध्ये अभ्यासासाठी मोबाइलचा वापर वाढला. मात्र, मोबाइलचा दुरुपयोगही होत असल्याचे आढळून येत आहे. अशावेळी पालकांनीही मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिला शिकल्या, मोठमोठ्या उच्च पदावर पोहोचल्या; परंतु समाजात वावरताना महिला व मुली आजही सुरक्षित नाही.’
कार्यक्रमाचे उपसरपंच संजीवनी पवार यांनी प्रास्ताविक केले. पोलीस पाटील आप्पासो गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो१२पळशी
मार्डी (ता. माण) येथे महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने निर्भया पथकाने मार्गदर्शन केले.