सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपरिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली जाहीर केली आहे. या दोन्ही विषयांचा विचार करून कराड नगर परिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पथनाट्याद्वारे १४ प्रभागांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने माहिती देण्यात आली.
पथनाट्याद्वारे सादरीकरण होत असताना नागरिकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मास्क वापरा हा संदेश प्रामुख्याने दिला जात होता. या पथनाट्याचे सादरीकरण व जनजागृतीसाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर यांनी नियोजन केले.