नागठाणे : ‘कायद्याच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न व समस्यांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे,’ असे उद्गार सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी काढले.
नागठाणे येथे महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि अँटी रॅगिंग समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा व अँटी रॅगिंग कायदा या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. त्यांनी वरील दोन्ही कायद्यांचे स्वरूप, तरतुदी व शिक्षा याविषयी सविस्तर विवेचन केले.
ॲड पाटील म्हणाले, ‘महिला व विद्यार्थिनींच्या इच्छेविरुद्ध असभ्य, अशोभनीय, अश्लील वर्तन व कृत्य करण्यास भाग पाडणे म्हणजे लैंगिक छळ होय. अन्याय, अत्याचार व छळ यापासून संरक्षण करणारा कायदा सामाजिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, शासनाच्या ध्येयधोरणानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करणे गरजेचे आहे.’
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे सामाजिक शास्त्र विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील भाषणात म्हणाले, ‘कायदा तयार करीत असताना समाजहित लक्षात घेऊन सर्व बाबींचा बारकाईने विचार केला जातो. शासनाच्या कायद्याला पळवाटा राहाणार नाहीत याची काळजी कायदेतज्ज्ञ घेतात.’
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केले. वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. संदीप लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. निकिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयमाला उथळे यांनी आभार मानले.