दीपक शिंदेसातारा : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील हे आत्तापर्यंत सर्वांना समजले आहे. ठाण्यात राहत असले तरी साताऱ्यातील शेतीत ते कायम रमतात याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. सण उत्सवाप्रमाणेच शेतातील प्रत्येक सुगीला त्यांची गावाकडे उपस्थिती असते आणि शेतात काम करुन घाम गाळण्याचा आनंदही ते घेतात.एकनाथ शिंदे, त्यांचे भाऊ प्रकाश, सुभाष आणि बहिण सुनीता यांच्या नावावर दरे तर्फ तांब या गावात शेती आहे. गावाकडचे अनेक लोक मुंबईत असल्यामुळे गावाकडची शेती वाट्याने गावातीलच एखाद्या व्यक्तीला करायला सांगितलेली असते. पण, सुगीच्या दिवसात कामाला लोक मिळत नाहीत. आता पावसानंतर भातलावण सुरु होते. त्यामुळे वाट्याने शेती करणाऱ्या वारंगुळदाराने भातलावणीला येणार असाल तर शेती करतो अशी अट घातलेली असते. त्यामुळे मुंबईत असणारे अनेक लोक भात लावणी, काढणी आणि पेरणीच्या वेळेला गावाला येतात. जसे सणांसाठी गावाला येतात तसेच ते सुगीसाठीही येतात.
एकनाथ शिंदे देखील असेच सुगीच्या काळात आपल्या दरे गावाला येतात आणि शेतीच्या कामात रममाण होता. एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबिय भाताची रोपे काढणे, लावणी करणे आणि मशागतीच्या कामांसाठी गावाला येतात. या तांबड्या मातीत घाम गाळात राजकारणाच्या सर्व गोष्टी विसरत ते शेतात काम करतात आणि घाम गाळतात.
शेतातील कष्ट काय आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी ते विविध योजना राबवित असतात. गावकऱ्यांसोबत ते विविध कार्यक्रमातही सहभागी होत असतात. भात लावणीनंतर येणाऱ्या गणेशोत्सावतही ते सहभाग होतात. त्याबरोबरच अनेकदा दिवाळी आणि यात्रेसाठीही गावाकडे हजेरी लावतात.
असा सर्वसामान्यांची आणि शेतकऱ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांची जाण असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाल्याने गावकऱ्यांपासून सर्वच जण समाधान व्यक्त करत आहेत.