नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शेती नियोजनबध्द, अभ्यासपूर्ण केली तर कमी क्षेत्रातही लाखो रुपये मिळवून देते. हेच सिध्द करुन दाखवले आहे ते माण तालुक्यातील भाटकीच्या शिक्षकाने. दोन एकरातील ५५० डाळिंबाच्या झाडातून यावर्षी २० लाखांहून अधिक उत्पन्न घेतले. विशेष म्हणजे दुष्काळी छाया असतानाही टॅंकरचे पाणी विकत घेत ही किमया साधली आहे.
माण तालुका दुष्काळी. पण, येथील शेतकऱ्यांनी माळराने फुलवली. खडक फोडून जमिनी तयार करत फळबागा लावल्या. त्यामुळे त्यांच्या कष्टालाही यश येत गेले. त्यातच शेती तोट्याची होत नाही. त्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास, हवामानाचा अंदाज आणि पाण्याची उपलब्धता असेल तर नियाेजनाने शेतीतून लाखोंची उड्डाणे घेता येतात. आता हेच दाखवून देण्याचे काम माणमधील शेतकरी करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे भाटकीचे दत्तात्रय शंकर शिर्के.
भाटकीचे दत्तात्रय शिर्के हे पेशाने शिक्षक आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते शहरात राहतात. पण, आठवड्यातून दोन दिवस सुट्टीला गावी असतात. शेतीसाठीही वेळ देत असल्याने त्यांनी डाळिंब बागेतून लाखोंची उड्डाणे घेतलीत. २०१७ साली त्यांनी भाटकीच्या उजाड माळरानावर दोन एकर क्षेत्रात डाळिंबाची ६३० झाडे लावली होती. त्यापैकी मर आणि इतर रोगाने ८० झाडे वाया गेली. तर सध्या ५५० झाडे बागेत आहेत. या भगव्या वाणाच्या झाडांपासून गेली तीन वर्षे ते विक्रमी उत्पादन घेत आहेत.
गेल्यावर्षी त्यांनी डाळिंबाचा ११ टन माल काढला. त्यातून १३ लाख ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर यावर्षी ८ जुलैला चेन्नईच्या व्यापाऱ्याला ११ टन डाळिंब माल १७२ रुपये किलोने दिला. तर ३ टन माल पुणे येथील मार्केटला पाठवला. आतापर्यंत एकूण १४ टन माल बागेतून निघाला असून २० लाख १५ हजारांचे उत्पन्न मिळालेले आहे. माणमधील डाळिंबाचा कमी क्षेत्रातील उत्पन्नाचा हा एक विक्रम मानला जातोय. त्यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे. तर त्यांना यासाठी कुटुंबाबरोबरच राजेंद्र बरडकर, चुलत भाऊ नामदेव शिर्के यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.