कोपर्डे हवेली : विद्यानगरमधून जात असलेल्या कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर लोकांची गर्दी वाढली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यानगरला रस्त्यानजीक अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये अनेकजण खरेदीसाठी येतात. मात्र, त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
रस्त्यानजीकच्या फलकांची मोडतोड
कऱ्हाड : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याकडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सूचना तसेच दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. उंडाळे ते येळगाव यादरम्यान लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची काही दिवसांपासून अज्ञातांकडून मोडतोड होत असल्याचे दिसून येत आहे. हे फलक अजूनही मोडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यानजीक फलक नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे.
रस्त्याकडेला कचरा; वारुंजी फाटा बकाल
कऱ्हाड : शहरालगत असलेल्या पाटण तिकाटणे परिसरातील महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. वारुंजी फाटा येथे उड्डाणपूल आहे. या परिसरात अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहे. या व्यावसायिकांसह काही इतर ठिकाणी व्यावसायिक त्यांचा कचरा उड्डाणपुलाच्या पूर्व तसेच पश्चिम बाजूला उघड्यावर टाकत आहेत. त्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरात पुन्हा वाढ
कऱ्हाड : प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, कापडी पिशव्यांच्या वापरात वाढ झाली आहे. परंतु काही व्यापारी, दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लॅस्टिक पिशव्यांचा चोेरी-छुपे वापर करीत आहेत. पालिकेने शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांसह पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.