रामापूर : पाटण येथील तहसील कार्यालयात दुचाकीची पार्कींग व्यवस्था कोलमडली आहे. तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी अस्ताव्यस्त लावल्या जातात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील पार्कींगबाबत कोणीही उपाययोजना करीत नाही. प्रत्येकाची याठिकाणी मनमानी सुरू आहे. त्यामुळे कुणीही या आणि कुठेही वाहने पार्क करा, अशी परिस्थिती दिसून येत आहे. याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्ष घालून पार्कींगची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कऱ्हाड ते ढेबेवाडीपर्यंत दुभाजकात वाढले गवत
मलकापूर : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम झाले. त्यावेळी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराने देखभाल दुरूस्ती करण्याची मुदत काही दिवस होती. ती मुदत संपल्यानंतर रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हळूहळू दुभाजकातील झाडे वाळत गेली. तर पावसामुळे गवत वाढत गेले. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.
पाटण ते चोपडीपर्यंतच्या रस्त्याची स्थिती दयनीय
रामापूर : पाटण, त्रिपुडी ते चोपडी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाटण त्रिपुडी ते चोपडी मार्गावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे लहानमोठे अपघात झाले आहेत. रस्त्याच्या दुरूस्तीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन दुरूस्ती करण्याची मागणी प्रवासी तसेच ग्रामस्थांमधून केली जात आहे.
तांबवे विभागामध्ये ऊसतोडीला आला वेग
तांबवे : विभागातील ऊसतोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या उभारल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करीत रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊस तोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
कऱ्हाडात सिमेंटच्या बाकड्यांची मोडतोड
कऱ्हाड : येथील पालिकेने शहरात ठिकठिकाणी बसवलेली सिमेंटची बाकडी तुटली आहेत. त्यामुळे स्थानिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बाकडी तुटल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय नाही. ही बाकडी तातडीने बदलण्याची मागणी होत आहे. काही बाकडी तुटल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत पालिकेने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाडात सिग्नलजवळील रिक्षा थांबे हटवा
कऱ्हाड : शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी मूळचे असलेल्या रिक्षा थांब्यामुळे सध्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. बसस्थानक परिसरात सिग्नल यंत्रणेलगतच हे रिक्षा थांबे असल्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.