सातारा : कुऱ्हाडीने डोक्यात वार करून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिवाजी हरिबा कदम(वय ४९,रा. बोरणे, ता. सातारा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवसांची साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, बोरणे, ता. सातारा येथील धाकीचा ओढा शिवारात १४ मे २०१५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जमिनीची मोजणी सुरू होती. त्यावेळी शिवाजी कदम याने बाळकृष्ण धोंडीबा गुजर ( ५८, रा. खटावकर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते.
बाळकृष्ण गुजर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी शिवाजी कदम याच्यासह अन्य दोघांविरोधत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चेतन मचले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयात आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी दोन साक्षीदार फितूर झाले. शिवाजी कदम यांच्यासोबत असलेले दोघे, मोजणी करणारे कर्मचारी आणि डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. महेश कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.