लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर ड्युटी करणाऱ्या होमगार्डवर उपासमारीची वेळ आली आहे. वयाच्या पन्नाशीत अनेक होमगार्ड बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडे जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सध्या ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहा महिने पगार नसल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे गेली अनेक महिने होमगार्ड पोलिसांसोबत ड्युटी करत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येनुसार शिथिलता आणली आहे. सातारा जिल्ह्यातही अनेक निर्बंध जिल्हा प्रशासनाने काही अटींवर उठवले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीसही बाधित झाल्यामुळे ५५ वयोगटापुढील पोलीस अमलदारांना फिल्ड ऐवजी पोलीस ठाण्यात ड्युटी दिली होती; मात्र गृहरक्षक दलाच्या पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांनाही बाधा होऊ नये म्हणून त्यांना काम न देणे राज्य शासनाने बंद केले. त्यामुळे वर्षभरापासून अनेक जवानांना घरी बसावे लागले. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, तरी ५० पेक्षा अधिक वयोगटातील होमगार्डला बंदोबस्त मिळत नाही. शिवाय गेली सहा महिने त्यांना मानधन मिळाले नसल्याने काम आणि मानधनाअभावी आपले घर कसे चालवायचे, या चिंतेत होमगार्ड आहेत. त्यातच सध्या ड्युटीवर असलेल्या होमगार्डची हीच अवस्था आहे. त्यांनाही या महिन्यापासून बंद नसल्याचे अनेक होमगार्डनी सांगितले.
चौकट: ५० टक्के लसीकरण
सातारा जिल्ह्यातील १४४१ होमगार्डना नोंदणी असून, त्यातील ११०० जवानांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. तर एक डोस केवळ २९० होमगार्डनी घेतला आहे. फिल्डवर काम करणाऱ्या होमगार्डने लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला असून, सर्वांची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली असल्याचे होमगार्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट: केवळ पन्नास वर्षे उलटली, या कारणास्तव माझ्यासह अनेकांचे आता बंदोबस्ताला नाव येणे बंद झाले आहे; परंतु रोजच्या गरजा कशा पूर्ण करायच्या. काम आणि वेतनाबाबत घर कसे चालवायचे, ही चिंता आहे.
होमगार्ड, पुरुष कर्मचारी सातारा.
कोट: गेल्या दहा वर्षांहून अधिक जास्त सेवा आम्ही केली आहे; पण केवळ पन्नास वर्षे वयाच्या अटीमुळे होमगार्डना काम देणे बंद झाले आहे. यावर राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे.
होमगार्ड सातारा
....
गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला एकदाही काम मिळाले नाही. कोणताही बंदोबस्त असो कधी माघार नाही घेतली. आपत्कालीन वेळी तर चार चार दिवस बाहेर राहिलो; पण मागे नाही हटलो. आत्ताच पन्नास वर्षे वयाची अट घातली जाते
एक होमगार्ड जवान, सातारा.
..........
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्ड १४४१
महिला होमगार्डची संख्या -१२३
५० पेक्षा जास्त वय असलेले- ७०
सध्या सेवेत असलेले-१३००