सातारा: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सुमारे १२०० आजारांवर ५ लाखांपर्यंत विनामूल्य उपचार होतात. कारागृहातून बाहेर गेल्यावरही याचा लाभ घेता यावा म्हणून सातारा जिल्हा कारागृहात बंदीवानांना आयुष्यमान भारत कार्ड व इ श्रम कार्ड काढून देण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती कारागृह अधिक्षक शामकांत शेडगे यांनी दिली.
देशात प्रथमच राज्याच्या कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील सातारा जिल्हा कारागृहात, राज्यात व देशात सर्वप्रथम कारागृहातील बंदी व कैद्यांचे ‘आयुष्यमान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड’ काढण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी समता फाऊंडेशनने सहकार्य केले आहे.
सातारा कारागृहात १८ महिला अंडरट्रायल कैद्यांसह सुमारे ३५० बंदीवान आहेत. तुरुंगात बंद असलेल्यांना आयुष्मान भारत कार्ड देण्यात यावे, यासाठी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी पुढाकार घेतला आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आतापर्यंत कारागृहातील एकूण ६५ जणांचे कार्ड काढून झाले आहे.
या उपक्रमास कारागृह सुरक्षेची काळजी घेवून वरिष्ठ तुरूंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, तुरूंग अधिकारी राजेंद्र भापकर, सुभेदार महेंद्र सोनवणे, मानसिंग बागल, हवालदार दारकु पारधी, राजेंद्र शिंदे, नामदेव खोत, दिलीप बोडरे तसेच शिपाई प्रतीक्षा पवार, अंकिता करपे, रेश्मा गायकवाड, रूपाली नलवडे, अहमद सन्दे, रणजित बर्गे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दळे, चेतन शहाणे, बालाजी मुंडे यांनी सहकार्य केले.
महिन्याला अनेक कैदी बाहेर पडतात आणि तुरुंगात प्रवेश करतात. राज्य सरकारच्या कारागृहात असल्याने कैद्यांचा वैद्यकीय खर्च सरकारकडून केला जातो. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून तो राज्यभरातील इतर कारागृहांतही राबविला जाणार आहे. कैद्यांना आयुष्मान भारत कार्ड प्रदान केल्यामुळे जामीन मिळवून किंवा शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर गेल्यावरही वैद्यकीय लाभ मिळू शकतो. - शामकांत शेडगे, अधीक्षक, सातारा जिल्हा कारागृह