'बाबा...तुम्ही विधानसभा लढवावी, चंद्रकांत दादांची कृपा अन् मुख्यमंत्र्यांची मेहरबानी नको'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 04:11 PM2019-09-29T16:11:28+5:302019-09-29T16:18:20+5:30
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक देखील 21 आँक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
मुंबई - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक देखील 21 आँक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. उदयनराजेंविरोधात काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणुक लढणवणार अशा गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची मुलगी अंकिता खोत यांनी बाबांनी विधानसभा निवडणुक लढवावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (रविवारी) आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिक्षा बोलत होत्या.
कराडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळ्यावत पृथ्वीराज चव्हाण यांची मुलगी अंकिता खोत यांनी सांगितले की, सध्या विधानसभा की लोकसभा बाबा कोणती निवडणुक लढवणार याची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. परंतु बाबांनी कराड विधानसभेचीच निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी बोलवून दाखविले आहे. त्याचप्रमाणे विरोधक म्हणतात पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईमध्ये असण्याची गरज नाही आहे. परंतु चंद्रकांत दादांची कृपा आणि मुख्यमंत्र्यांची मेहरबानी कराडवर आम्हाला नको आहे. त्यामुळे कराडमधला आमचा आमदार मुंबईला असणं गरज असल्याचे देखील अंकिता खोत यांनी ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे कराडला MH 50 हे खूप मोठं गिफ्ट दिल्याचं देखील त्यांनी सांगितले.
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंसमोर कडवे आव्हान उभे करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यासाठी साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडून तेथून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. यासाठी कराडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुलीसह सर्व कार्यकर्त्यांकडून देखील विधानसभा निवडणुक लढा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण नेमकं कुणाचं ऐकणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.