सातारा : ‘माझ्याविरोधात उभे राहिलेले भाजपचे उमेदवार एका घरात कधी जास्त काळ राहिले नाहीत. त्यांनी आधीच काँगे्रस, शिवसेना असा प्रवास केला आहे. आता ते किती दिवस भाजपचे पाहुणे असणार आहेत, हे भाजप निष्ठावंतांनी माहिती करून घेऊनच त्यांचा प्रचार करावा,’ अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. सुरूची या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अॅड. दत्ता बनकर, नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, रवींद्र झुटिंग, भालचंद्र निकम, प्रवीण पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित त्यांनी यावेळी आपल्या जाहीरनाम्याचे प्रकाशनही केले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘निवडणूक आली की, जनतेसमोर आलेल्या विरोधी उमेदवारांनी सातारा-जावळीसाठी काय योगदान दिले आहे? काही उमेदवारांच्या घरात वडिलांपासून सत्ता होती. मात्र, जनतेनेच त्यांना एकदाचे घरी बसविले. मागे कुडाळ गटात आमच्यामध्ये पडलेल्या दुफळीचा त्यांनी फायदा घेतला. एकदा शिवसेना, एकदा भाजप असं ते आणखी किती घरांचा प्रवास करणार आहेत. ते भाजपमध्येही जास्त काळ टिकून राहतील, याबाबत शाश्वती नाही.निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली नाही, अशी आवई उठवून ते पक्षाबाहेर पडतील. त्यामुळे ते किती दिवसांचे पाहुणे आहेत, याचा विचार करून निष्ठावंतांनी त्यांचा प्रचार करावा, हवं तर त्यांच्याकडून तसं लिहून घ्यावं. असे हंगामी नेतृत्व कामाचे नसते, हे आधी भाजप निष्ठावंतांनीही जाणून घ्यावं.’‘विरोधक एकाच घरात चाळीस वर्षे सत्ता असल्याचा आरोप करतात, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेंनी लोक प्रेमापोटी आमच्या पाठीशी आहेत. मतदार स्वत: बटन दाबतात, मी नाही, आम्ही नेहमीच समाजात एकी ठेवण्याचा प्रयत्न केला, याचीच ती पोहचपावती आहे.’ दीपक पवारांनी नगरपालिकेला पॅनेल उभे करण्याचा इशारा दिला आहे, याबाबत छेडले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘नगरपालिकेलाच काय साखर कारखाना, जिल्हा बँकेचीही निवडणूक त्यांनी लढवावी. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल.’दरम्यान, त्यांच्या जाहिरनाम्यात कास तलाव उंची, शहरातील रस्त्यांसाठी आणलेला निधी, सातारा व जावळी तालुक्यांतील विविध विकासकामे, तीर्थक्षेत्र विकास आदी योजनांचा उल्लेख केला आहे. (प्रतिनिधी)आता तरी पक्षाने विचार करावाअनेक वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केले आहे. आता तरी मंत्रिपदासाठी पक्षाने विचार करणे गरजेचे आहे, अशी सुप्त इच्छा शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
बाबाराजे म्हणाले, ‘हे किती दिवसांचे पाहुणे’
By admin | Published: October 06, 2014 9:54 PM